मराठी सिनेमांची नायिका ते मराठी-हिंदी सिनेमांमधील आईच्या भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी हे नाव घेतले की त्यांच्या सोज्वळ, शालीन सौंदर्य असलेला चेहरा आणि कारकिर्दीच्या उत्तरार्धात मराठी व हिंदीच्या रूपेरी पडद्यावरील चार-पाच पिढय़ांमध्ये गाजलेल्या कलावंतांच्या आईच्या भूमिका आठवतात. त्यांनी साकारलेल्या आईच्या भूमिकांमध्येही करारी, दयाळू, हतबलता असे अनेक पैलू रूपेरी पडद्यावर दाखविले. या ज्येष्ठ अभिनेत्रीच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या गाजलेल्या भूमिका आणि त्यांनी ज्यांच्यासोबत वेळोवेळी काम केले त्या गाजलेल्या व्यक्तिमत्वांचे सुलोचनादीदींविषयीच्या भावना त्यांच्याच शब्दांत लोकांसमोर येणार आहेत.  दस्तुरखुद्द सुलोचना दीदींसह मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे आदी उपस्थित राहणार आहेत.
दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी अ‍ॅकॅडमी ऑफ सिनेमा अ‍ॅण्ड थिएटरतर्फे ‘लिव्हिंग लिजण्ड’ व्यक्तिमत्वांवर वेगवेगळ्या कार्यक्रमांची आखणी केली असून त्या मालिकेत पहिला कार्यक्रम सुलोचनादीदींवरचा असून त्याचे नाव ‘सुलोचनाई’ असे आहे. ११ ऑगस्ट रोजी रवींद्र नाटय़ मंदिरात रात्री ८ वाजता हा दृकश्राव्य, संगीत कार्यक्रम होणार आहे.
आपले गुरू भालजी पेंढारकर आणि अनेक मराठी चित्रपट दिग्दर्शकांबरोबरच बिमल रॉय, बी. आर. चोप्रा, राज कपूर, हृषिकेश मुखर्जी, यश चोप्रा, विजय आनंद, मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा, सुभाष घई, राकेश रोशन आदी हिंदीतील दिग्दर्शकांच्या चित्रपटांतून सुलोचनादीदींनी आईच्या भूमिका साकारल्या. त्याचबरोबर देवआनंदपासून अमिताभ बच्चनपर्यंत अनेक कलावंतांच्या आईच्या भूमिकेत त्या प्रेक्षकांसमोर आल्या. ‘सुलोचनाई’ या कार्यक्रमात दीदींच्या ५५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीबद्दल आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सीमा देव, रमेश देव, रीमा लागू, सचिन पिळगावकर, आशुतोष गोवारीकर, डॉ. जब्बार पटेल, महेश कोठारे, मधुर भांडारकर, महेश मांजरेकर, डॉ. मोहन आगाशे असे दिग्गज बोलणार आहेत.
‘लिव्हिंग लिजण्ड’ मालिकेअंतर्गत दर दोन महिन्यांनी अ‍ॅकॅडमी ऑफ सिनेमा अ‍ॅण्ड थिएटरतर्फे ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, अभिनेता अशोक सराफ आदी अनेक दिग्गजांवर कार्यक्रम केले जाणार असून या माध्यमातून दिग्गज कलावंतांचे रूपेरी सृष्टीतील योगदानाचे महत्त्व आजच्या पिढीपर्यंत पोहोचविणे, त्याचबरोबर दिग्गजांच्या कारकिर्दीचे दस्तावेजीकरण दृकश्राव्य माध्यमात करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे पुरुषोत्तम बेर्डे, दीपक सावंत यांनी सांगितले.