राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने देशभरातील अतिसंवेदनशील व्याघ्र प्रकल्पांकरिता विशेष व्याघ्र संरक्षण दल (स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स) तयार केले आहे. विदर्भासह देशभरातील अनेक व्याघ्र प्रकल्पांत तैनात असलेले हे दल विदर्भातील पेंच आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातसुद्धा तैनात आहे. या दोन व्याघ्र प्रकल्पानंतर आता मेळघाट व नवेगाव-नागझिरा या व्याघ्र प्रकल्पांतसुद्धा विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या नियुक्तीवर राज्य शासनाने बुधवारी शिक्कामोर्तब केले.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसत्ताला दिलेल्या सदिच्छा भेटीत सर्वप्रथम यासंदर्भात सूतोवाच केले होते. मात्र, घोषणा करूनच ते थांबले नाहीत तर त्यादृष्टीने पावले उचलण्यास त्यांनी सुरुवात केली. यासंदर्भात प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयातून प्रस्ताव गेल्यानंतर उच्चस्तरीय समितीने ८ एप्रिलला या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर बुधवारी या दोन्ही व्याघ्र प्रकल्पांतील विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या तैनातीसंदर्भात शासनाने शिक्कामोर्तब केले. २०१५-२०१६ या वर्षांत नवेगाव-नागझिरा व मेळघाट या व्याघ्रप्रकल्पात विशेष व्याघ्र संरक्षण दल नियुक्त करण्यात येईल. ११२ जवानांच्या या दलात एक सहाय्यक वनसंरक्षक दर्जाचा अधिकारी, त्यांच्या अधिनस्थ तीन वनपरिक्षेत्र अधिकारी, ८१ वनरक्षक आणि २७ वननिरीक्षक यांचा समावेश असेल. ३०-३० जवानांच्या तीन तुकडय़ा यात असून प्रत्येक तुकडीचे नेतृत्त्व वनपरिक्षेत्र दर्जाचा अधिकारी करेल. ताडोबात तीन वर्षांपूर्वी शिकाऱ्यांनी घातलेला धुमाकूळ आणि वाढलेली वाघांची संख्या तसेच पेंच व्याघ्र प्रकल्पातसुद्धा शिकाऱ्यांचा शिरकाव बघता या ठिकाणी यापूर्वीच विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करण्यात आले होते. गेल्या दोन वषार्ंपासून मेळघाट व्याघ्र प्रकल्पातसुद्धा एकापाठोपाठ एक वाघांच्या शिकारी उघडकीस येत आहेत. त्यामुळे मेळघाटात या दलाची मागणी आधीपासूनच होती. तर नवेगाव-नागझिरा हा व्याघ्रप्रकल्प हा नव्यानेच झाल्याने या ठिकाणीही वाघांचे सातत्याने होणारे स्थलांतर बघता येथेही विशेष व्याघ्र संरक्षण दल आवश्यक होते.
सुधीर मुनगंटीवार यांनी वन मंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच त्यादृष्टीने सकारात्मक पाऊल उचलले. या दलात प्रामुख्याने स्थानिकांनाच प्राधान्य देण्याचा प्रयत्न राहणार आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण दल चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. तर पेंच व्याघ्रप्रकल्पात नियमाविरुद्ध जाऊन ३०-३०चे दल फोडून त्यातील जवानांना संरक्षण कामाव्यतिरिक्त इतर ठिकाणी नियुक्त केल्याने त्याचे दुष्परिणामही भोगावे लागले आहे. त्यामुळे मेळघाट व नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात हे दल नियुक्त करताना विशेष
काळजी घेण्यात येईल. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि राज्य सरकार यांच्यात यासंदर्भात सामंजस्य करार झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special tiger protection force in melghat and navegaon nagzira
First published on: 25-04-2015 at 12:47 IST