खार- वांद्रे परिसरात गेल्या काही महिन्यांत कडी-कुलप न तोडता झालेल्या चोऱ्यांनी पोलिसांना हैराण करून सोडले आहे. या चोऱ्यांमागे ‘स्पायडर मॅन’ चोर असल्याचा पोलिसांचा संशय आहे. तसे काही दुवे पोलिसांना सापडले आहेत. ‘स्पायडर मॅन’प्रमाणे झपाझप पाइपवर चढायचे आणि घरात घुसून चोरी करण्याची ही पद्धत अवलंबणाऱ्या काही संशयितांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. वांद्रे पूर्वेत मंगळवारी झालेल्या ५० लाखांच्या चोरीमागेही हीच पद्धत असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.वांद्रे पश्चिमेतील ओशियानिक सोसायटीत राहणाऱ्या आशा सहानी यांच्या घरी सर्वजण झोपलेले असताना मंगळवारी मध्यरात्री शयनगृहात शिरून अज्ञात इसमांनी तब्बल ५० लाखांचे दागिने लुटले. घरातील या चोरीची सहानी कुटुंबीना सकाळी कल्पना आली. तेव्हा या दागिन्यांपैकी काही दागिने खिडकीवर पडलेले आढळले. त्यामुळे पाइपवरून चढून तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये चोर शिरल्याचे पाहून ते हादरलेच. आपण राहतो ते घर सुरक्षित नाही, असेच त्यांना आता वाटू लागले आहे.
मात्र गुन्ह्य़ाची ही पद्धत पहिलीच नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अशी पद्धत यापूर्वीही वापरण्यात आली होती. या पद्धतीचे पोलिसांनी ‘स्पायडर मॅन चोर’ असे नामकरण केले आहे. या घटनेतील चोरटय़ांना दागिने नेमके कुठे होते वा कपाटाची चावी आदींची कल्पना असते. त्यामुळे कोणीतरी घरात काम करणाऱ्या व्यक्तीने या बाबतची टीप दिली असण्याची शक्यता आहे. किंबहुना या टोळीमध्ये अशा लोकांचा भरणा असावा, असा पोलिसांचा दाट संशय आहे.
खार परिसरातही दुसऱ्या- तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये शिरून चोरी झाल्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. ज्या फ्लॅटच्या खिडक्यांना जाळ्या नाहीत, अशाच फ्लॅटमध्ये चोऱ्या झाल्या आहेत. समुद्राचे विनाअडथळा दर्शन घेता यावे, यासाठी वांद्रे-खार परिसरात समुद्राच्या कडेला असणाऱ्या अनेक सोसायटय़ांमध्ये फ्लॅटला संरक्षक जाळ्या नसल्याचा चोरटे फायदा उठवीत आहेत. त्यामुळे यापुढे तरी संबंधित फ्लॅटधारकांनी अशा जाळ्या बसवाव्यात असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Aug 2013 रोजी प्रकाशित
‘स्पायडर मॅन’चा धुडगूस?
खार- वांद्रे परिसरात गेल्या काही महिन्यांत कडी-कुलप न तोडता झालेल्या चोऱ्यांनी पोलिसांना हैराण करून सोडले आहे. या चोऱ्यांमागे ‘स्पायडर मॅन’ चोर असल्याचा पोलिसांचा संशय आहे. तसे काही दुवे पोलिसांना सापडले आहेत. ‘
First published on: 02-08-2013 at 08:41 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spider man roabbers in khar bandra area