गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत कोल्हापूर, मुंबई व पुण्याच्या संघांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. क्रीडासंकुलात शालेय कबड्डी स्पर्धेचे अंतिम सामने बुधवारी झाले. १७ वर्षे वयोगटातील अंतिम सामना औरंगाबाद विरुद्ध कोल्हापूर झाला. अटीतटीच्या लढतीत कोल्हापूरने औरंगाबाद संघावर अवघ्या १ गुणाने मात केली. १७ वर्षे मुलींच्या गटात यजमान लातूर विरुद्ध कोल्हापूर या सामन्यात कोल्हापूरने लातूरवर तब्बल २७ गुणांनी मात करताना सामना एकहाती गुंडाळला. १९ वर्षे मुलांच्या गटात कोल्हापूर विरुद्ध मुंबई हा सामना रंगतदार झाला. मुंबई संघाने कोल्हापूरवर एक गुणाने मात केली. १९ वर्षे मुलींच्या गटात पुणे विरुद्ध मुंबई असा अंतिम सामना झाला. पुणे संघाने मुंबईवर दोन गुणांनी मात करीत विजय संपादन केला. स्पर्धेत राज्यातील ३२ संघ व ४०० खेळाडू सहभागी झाले.