राज्यातील पोलीस भरतीच्या अनुषंगाने येत्या दोन आठवडय़ात मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवला जाईल. सुमारे ६१ हजार २९४ रिक्त पदांची भरती हाती घेतली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात १२ हजार २७९ पदे भरली जातील. राज्यात १२५ नवीन पोलीस ठाणीही सुरू करण्यात येणार असून, औरंगाबाद शहरात ६ ते ८ पोलीस ठाणी नव्याने उभारली जातील. भरतीच्या माध्यमातून नव्याने ४९९ पोलीस औरंगाबादला मिळतील, अशी माहिती गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी येथे पत्रकारांना दिली.
औरंगाबाद येथे आयोजित राज्यातील पोलिसांचा कर्तव्य मेळाव्याचे उद्घाटन झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मेळाव्यात बोलताना राज्यातील एकूण गुन्हेगारीच्या प्रमाणापैकी ५३ टक्के गुन्हे सायबर क्राईमशी जोडले गेले आहेत. माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करून आर्थिक घोटाळे तर वाढलेच आहेत. दहशतवादी कारवायांमध्येही मोठय़ा प्रमाणात तंत्रज्ञान वापरले जात आहे. त्यामुळे त्याच्या मुकाबल्यासाठी पोलिसांनी अधिक ‘सबल’ व्हावे, असे आवाहन पाटील यांनी केले. अतिरिक्त पोलीस महासंचालक एस. पी. यादव, माजी न्या. नरेंद्र चपळगावकर यांची उपस्थिती होती.
बदलत्या काळात गुन्हेगारीचे स्वरूपही बदलत आहे. सीसीटीव्हीचा आग्रह धरला जात आहे. ते जरूर बसवू. परंतु या कॅमेऱ्यांतील माहितीचा उपयोग तपासकामात करण्यास विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. येत्या काही दिवसांत गुन्हेगाराचे छायाचित्र, बोटांचे ठसे व त्याच्याविषयीची सगळी माहिती उपलब्ध असावी, असे प्रयत्न केले जात आहेत. संगणकाच्या माध्यमातून सर्व पोलीस ठाणी जोडली जाणार आहेत. त्यामुळे तपासकामात अधिक वेग येऊ शकेल. गेल्या काही दिवसांत शिक्षेचा दर घटला होता. पोलिसांनी केलेला तपास, दाखल केलेले दोषारोपपत्र व नव्या पद्धतीने केलेल्या तपासाची माहिती न्यायालयापर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे पाटील म्हणाले.
माजी न्या. चपळगावकर यांनी तालुकास्तरावर पोलिसांनी केलेला तपास न्यायाधिशापर्यंत नीटपणे पोहोचविला जात नाही. आधुनिक पद्धतीने केलेल्या तपासाचे पुरावे सादर केले जातात, मात्र त्याचे महत्त्व पटवून सांगितले जात नाही. तालुकास्तरावरील काही न्यायाधिशांनाही या अनुषंगाने प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे सांगितले. चपळगावकर यांच्या भाषणातील हा धागा पकडून सतेज पाटील म्हणाले की, अशा पद्धतीने कार्यशाळा घेण्यासाठी मुख्य न्यायमूर्तीकडे पत्रव्यवहार केला जाईल. कर्तव्य मेळाव्यास आलेल्या विविध जिल्ह्य़ांतील पोलिसांनी शिस्तबद्ध संचलन केले. ‘२६/११’च्या पाश्र्वभूमीवर कार्यक्रमात हार व पुष्पगुच्छांना फाटा देण्यात आला. कार्यक्रमास पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.