दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा तयार करण्यात येणार असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हा पुतळा लवकरच निगडीतील यमुनानगरमधील प्रबोधनकार ठाकरे उद्यानात उभारण्यात येणार आहे. कळस येथील शिल्पकार सुभाष आल्हाट, शकील खान व त्यांचे सहकारी हा पुतळा घडवत आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा साडेपाच फूट उंच सिंहासनावर बसलेला भव्य असा ब्राँझचा पुतळा उभारण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे नेहमीच ज्या सिंहासनावर बसत असत. त्याच आसनावर बसलेल्या स्थितीतील हा पुतळा आहे. या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुतळ्यावर शेवटचा हात फिरवण्याचे काम सध्या सुरू आहे. हा पुतळा बनविण्यासाठी गेला दीड महिना मेहनत घेण्यात येत आहे.
शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे, सहसंपर्कप्रमुख श्रीरंग बारणे, जिल्हाप्रमुख बाबासाहेब धुमाळ व इतर पदाधिकाऱ्यांनी पुतळ्याची पाहणी केली. त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार पुतळ्यात काही बदल केले जातील. सुलभा उबाळे म्हणाल्या की, या पुतळ्याचे वजन सुमारे दीड हजार किलो आहे. नागरिकांच्या कल्पनेनुसार तो बनविण्यात आला आहे.