‘थर्टी फर्स्ट’च्या निमित्ताने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेलमधून आयोजित केल्या जाणाऱ्या करमणुकीच्या कार्यक्रमांची तपासणी करण्यासाठी महसूल विभागाच्या करमणूक शाखेने यंदा जिल्हाभर पथके तैनात केली आहेत. क्लब्ज व खासगी कंपन्यांनी छुप्या पद्धतीने आयोजित केलेले कार्यक्रमही पथकाच्या ‘रडार’वर असतील. किमान नगर व शिर्डीतील तरी प्रत्येक हॉटेल तपासले जावे या पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे.
प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली हे पथक कार्यरत होईल. नगर शहरात ४ पथकांद्वारे सायंकाळपासूनच तपासणी मोहीम सुरु केली जाणार आहे. शिर्डी येथे हॉटेल अधिक संख्येने असल्याने तेथे ६ पथके तयार करण्यात आल्याचे सहायक करमणूक कर अधिकारी भगीरथ नेवसे यांनी आज सांगितले. या पथकासमवेत पोलीसही असतील.
वर्षांखेरीचा दिवस जल्लोषात साजरा करण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे. या तरुणाईला आकर्षित करण्यासाठी हॉटेल धाबा याठिकाणी विविध प्रकारचे करमणुकीचे, मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. तिकिट लावून आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी १५ टक्के करमणूक कर आकारला जातो व त्यासाठी परवानगीची आवश्यकता आहे. परंतु कर टाळण्यासाठी हॉटेल व्यावसायीक जेवणाच्या बिलातच करमणूक कार्यक्रमाच्या दराचा समावेश करतात. काही व्यावसायीक त्यासाठी तिकिट ठेवतात. त्यामुळे नगर व शिर्डी परिसरातील सर्वच हॉटेल, धाब्यांची तपासणी केली जाणार आहे. त्यांच्याकडील बिले व तिकिटे तपासली जातील. परवानगी घेतली नसल्यास १८ टक्के दंड आकारुन करमणूक कर वसूल केला जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक दिवसासाठी २४ टक्के दंड आकारला जाईल.
केवळ हॉटेल, धाबा व्यावसायीकच नाही तर खासगी क्लब्ज, जिमखाना, कंपन्या यांनी आपले कर्मचारी, सभासद यांच्यासाठी खासगी जागेत आयोजित केलेले मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठीही परवानगी आवश्यक आहे व
त्यासाठी कर देणे आवश्यक आहे, अशा कार्यक्रमांचीही तपासणी केली जाणार आहे, असे नेवसे यांनी सांगितले. तशा सूचनाही प्रत्येक तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत.    
कर बुडवण्याकडेच कल
‘थर्टी फर्स्ट’च्या कार्यक्रमासाठी परवानगी घेणे आवश्यक असल्याचे महसूल विभागाने आवाहन केले असले तरी संपूर्ण जिल्ह्य़ातून केवळ नगरजवळील साई रिसोर्ट (पिंपळगाव माळवी) या एकमेव व्यावसायिकाने परवानगीसाठी अर्ज केला आहे. बहुसंख्य व्यावसायिकांचा कल कर टाळण्याकडेच आहे. गेल्या वर्षीही केवळ साई रिसोर्ट व यश ग्रँट या दोघांनीच परवानगी घेतली होती. पोलीस विभागाकडे चौकशी करता, थर्टी फस्र्टच्या बंदोबस्ताचे नियोजन अद्याप झाले नसल्याचे सांगण्यात आले.