भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, त्यांचे व्याही भानुदास कोतकर व माजी महापौर संदीप कोतकर यांच्यावरील कारवाईच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदान येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर तालुकाध्यक्ष अमोल जाधव, लांडे खूनप्रकरणातील मूळ फिर्यादी शंकरराव राऊत यांच्यासह काही जणांनी आजपासून उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणकर्त्यांची आज विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्यासह आ. अनिल राठोड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, प्रदेश सरचिटणीस अंबादास गारुडकर यांनी भेट घेतली. उद्या (बुधवारी) गृहमंत्री आर. आर. पाटील यांना आंदोलक भेटणार आहेत.
अमोल जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले की, आ. कर्डिले, भानुदास कोतकर, संदीप कोतकर यांच्याविरुद्ध कोतवाली व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल व न्यायप्रविष्ट आहेत. ते त्वरित चालवून निकाली काढावेत. कर्डिले यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रलंबित असलेला प्रस्ताव मार्गी लावावा. कर्डिले यांनी खोटे प्रतिज्ञापत्र दाखल करून मुख्यमंत्री कोटय़ातून चार सदनिका व तीन भूखंड मिळवले, त्याची चौकशी करावी व सरकार जमा करावेत. लोकसभेची सन २००९ ची निवडणूक व राहुरी विधानसभेच्या निवडणुकीत कर्डिले यांनी खोटी माहिती दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा.
कर्डिले यांचे बंधू व पुतण्याकडून शेतक-यांच्या जमिनीची जबरदस्तीने खरेदी विक्री करण्यात आली, फसवणूकही करण्यात आली, त्याची चौकशी करावी, लांडे खून प्रकरणातील साक्षीदारांवरही कर्डिले यांच्याकडून दबाव आणला जात आहे, अशी तक्रार जाधव यांनी केली आहे. नंदू सुरवसे, सूर्यभान नांगरे, मिलिंद मोभारकर, केशव शिंदे, सिंधूताई कर्डिले, सागर बेरड, राहूल ढोले, ज्ञानेश्वर कर्डिले आदी उपोषणात सहभागी झाले आहेत.
फोटो ओळी-
भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादीचे अमोल जाधव, शंकरराव राऊत, नंदू सुरवसे आदींनी मुंबईतील आझाद मैदानात मंगळवारपासून उपोषण सुरू केले आहे.