एमबीए या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला पुणे, मुंबईतील बिझनेस स्कूलमध्ये प्रवेश घेण्याऐवजी चंद्रपूर, नागपूर येथील महाविद्यालयात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला असून नामांकित उद्योग समूह व कंपन्यात प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत हा बदल घडून आला आहे.
 पुणे, मुंबईतील महाविद्यालयांमध्ये प्लेसमेंट सेलद्वारा उत्तम नोकरीची संधी प्राप्त होते या आशेने गेल्या काही वर्षांपासून भक्कम फी भरून विदर्भातील विद्यार्थी तेथे प्रवेश घेत असत मात्र अलीकडच्या काळात जागतिक आर्थिक मंदीचे कारण पुढे करून तेथील महाविद्यलयांकडून नोकरीची संधी कमी झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा कल आता बदलत असून बाहेरगावी शिक्षणाकरिता येणारा खर्च, फिची मोठी रक्कम, मुले घरापासून लांबवर राहतांना पालकांना वाटणारी असुरक्षिता या पाश्र्वभूमीवर चंद्रपूर, नागपूर येथील महाविद्ययालतील प्लेसमेंट सेलचे माध्यमातून अनेक कंपनी व उद्योग समूहात कॅम्पस इंटरव्यूह द्वारा नोकरी प्राप्त होत असल्याने विद्यार्थी स्थानिक महाविद्यालयात प्रवेश घेत आहेत.
देशातील मोठय़ा शहराचे तुलनेत आता स्थानिक एमबीए महाविद्यालयांमध्ये उत्तमोत्तम सुविधा उपलब्ध असल्याने देशाचे इतर भागातूनही विद्यार्थी येथे प्रवेशाकरिता इच्छूक आहेत.
प्रवेशाकरिता आवश्यक असलेल्या सी मॅट प्रवेश परीक्षेला न बसलेल्या इच्छूक विद्यार्थ्यांना आता आणखी एक सुवर्णसंधी चालून आली असून येत्या १६ जूनला होणाऱ्या एएमएमआय पुणे द्वारा घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेला बसून आता एमबीए पूर्ण करता येणार आहे.