पीटीआय, कान
भारतीय चित्रपट दिग्दर्शिका आणि लेखिका पायल कपाडिया यांच्या ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाईट’ या चित्रपटाला प्रतिष्ठेच्या कान २०२४ चित्रपट सोहळ्यात ‘ग्रां पी’ पुरस्काराने गौरवण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय दिग्दर्शिका ठरून पायल कपाडिया यांनी इतिहास रचला आहे. ‘ग्रां प्री’ हा कानमधील ‘पाम डोर’ पुरस्कारानंतर दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे.
‘ऑल वी इमॅजिन ॲज लाईट’ हा चित्रपट गुरुवारी रात्री दाखवण्यात आला. कोणत्याही भारतीय दिग्दर्शिकेचा चित्रपट मुख्य स्पर्धेसाठी दाखवला जाण्याची ही पहिलीच वेळ होती, तर भारतीय चित्रपट मुख्य स्पर्धेसाठी निवडला जाण्याची गेल्या ३० वर्षांतील ही दुसरी वेळ होती.यापूर्वी शाजी एन करुण यांचा ‘स्वहम’ चित्रपट १९९४च्या कान सोहळ्यातील मुख्य प्रदर्शनासाठी निवडला गेला होता.