आपत्ती व्यवस्थापन हे केवळ शासनाचे काम नसून सर्वाचे आहे. आपत्ती व्यवस्थापनात विद्यार्थ्यांची भूमिका महत्वाची असते, असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त साहेबराव पाटील यांनी केले. येथील केटीएचएम महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी कल्याण मंडळाने आयोजित जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेत ते बोलत होते.
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सरचिटणीस नीलिमा पवार अध्यक्षस्थानी होत्या. प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, उपप्राचार्य एस. सी. पाटील, डॉ. डी. आर. बच्छाव, प्रा. एस. टी. पाटील आदींनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. स्पर्धा आणि आपत्तींना तोंड देण्यासाठी विद्यार्थ्यांनी मानसिक व शारीरिकदृष्टय़ा सदैव सक्षम असले पाहिजे. शिस्त, संस्कृती, सामाजिक बांधिलकी यांचे महाविद्यालयीन जीवनात पालन केल्यास अपयश येणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले. नीलिमा पवार यांनीही आपत्तीला तोंड देण्यासाठी समयसूचकता तसेच स्वयंविकास महत्वाचा असतो. मुला-मुलींनी आपल्या समस्या इतरांशी शेअर कराव्यात. भारतात आपत्ती व्यवस्थापन योग्य नाही. विद्यार्थ्यांच्या मदतीने हे चित्र बदलता येईल, असा विश्वास व्यक्त केला.