विद्यार्थ्यांनी इंटरनेटच्या महाजाळात न अडकता सातत्याने दर्जेदार साहित्य वाचून आपले भविष्य उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन येथील अण्णासाहेब मुरकुटे अभ्यासिका व सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित दिवाळी अंक योजनेच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. निशा पाटील यांनी केले.
अण्णासाहेब मुरकुटे अभ्यासिका आणि सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी अंक योजनेच्या उद्घाटनाच्या  कार्यक्रमाला व्यासपीठावर माजी उपमहापौर व अभ्यासिकेचे अध्यक्ष अ‍ॅड. मनिष बस्ते, नेचर क्लबचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, साई करिअरचे दत्तात्रय जाधव उपस्थित होते.
मुरकुटे अभ्यासिकेच्या वतीने दिवाळी अंक योजनेचे हे १६ वे वर्ष असून योजनेतंर्गत वाचकांना शंभर दिवाळी अंक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
यामध्ये माहेर, मेनका, आवाज, मोहिनी, हंस, किशोर, अक्षर, यांसारख्या अंकांचा समावेश आहे. यावेळी प्रा. पाटील यांनी विविध साहित्यिकांची माहिती देत साहित्य म्हणजे वाचक व लेखक यांच्यातील संवाद असून तो संवाद इ-लर्निगने कधीच भरून निघणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे संवाद वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्याने दर्जेदार साहित्य  वाचावे असा पाटील यांनी आपल्या भाषणातून दिला.
प्रा. बोरा यांनी विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करावा तसेच त्यासोबत निसर्ग भ्रमंती देखील आवश्य करावी असा सल्ला आपल्या मनोगतामधून दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. बस्ते यांनी केले. तर कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन गोपाळ मोजाड यांनी केले. उपस्थितांचे आभार भाग्यश्री कोकाटे यांनी मानले.