प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाटय़गृहात रूपकुमार राठोड आणि सोनाली राठोड यांच्या सुफियाना सुरांच्या सुरेल बरसातीने रसिक मंत्रमुग्ध झाले. ‘जीवनगाणी’च्या वतीने आयोजित ‘तेरे लिये’ या मैफलीच्या निमित्ताने राठोड दाम्पत्य पहिल्यांदाच डोंबिवलीत गायले. ‘वीर झारा’मधील संगीतकार मदन मोहन यांच्या सुरावटीने नटलेले ‘तेरे लिये’, ख्वाजा मेरे ख्वाजा, लागा चुनरी में दाग, मुझे इश्क का कलमा, वो भुली दास्ता, चिठ्ठी आयी है, तुझ में रब दिखता है, वो सैय्या, जिवलगा आदी अनेक लोकप्रिय गाणी या मैफलीत सादर करण्यात आली.
सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त भिसे आदी मान्यवर या मैफलीस उपस्थित होते. डोंबिवलीतील ज्येष्ठ ध्वनिसंयोजक नाना कुलकर्णी यांचा या वेळी खास गौरव करण्यात आला. राजू कुलकर्णी, टिटु कुलकर्णी या त्यांच्या पुढील पिढीनेही ध्वनिसंयोजनाची परंपरा समर्थपणे सांभाळली आहे.
अनेक दिग्गज गायकांच्या मैफलींचे ध्वनिसंयोजन कुलकर्णी बंधू करतात. त्यात राठोड दाम्पत्याचाही समावेश आहे. कुलकर्णी बंधूंच्या स्नेहापोटी आपण येथे आलो असल्याचे रूपकुमार राठोड यांनी या वेळी आवर्जून नमूद केले.