उन्हाळ्यात सध्या आठवडय़ाला बारा ते पंधरा ट्रक ऊस बाजारात येत असून सुमारे २५ लाख नागपूरकरांची दाहकता कमी करीत आहे. वाढत्या तापमानात अंगाला थंडावा देणारा उसाच्या रसाचा हंगाम केवळ चार महिन्यात एक हजार जणांना थेट रोजगार मिळवून देतो.
उन्हाळा आता सुरू झाला असून तापमान ४० अंशावर पोहोचले आहे. सकाळी दहा वाजेपासूनच उन्ह वाढू लागते. दुपारी उन्हाचे चटके बसतात, अंगातून घामाच्या धारा वाहू लागतात. अंगाची काहिली होते. घसा कोरडा होतो आणि मग आठवण येते ती उसाच्या रसाची. एकच प्याला उसाचा रस क्षणभरात थंडावा देतो, मन प्रफुल्लित करतो आणि थकल्या-भागल्या शरीराला नवा तजेला देतो. ऊस हा काविळीवर रामबाण उपाय असल्याचे डॉक्टर नेहमी सांगतात. उन्हाळा सुरू झाला असतानाच शहरात विविध ठिकाणी उसाच्या रसवंत्या सुरू झाल्या आहेत. शहरात विविध ठिकाणी या रसवंत्या असल्या तरी तो घाऊक स्वरूपात केवळ शनिचरा परिसरातच मिळतो.
एम्प्रेस मॉलसमोर आठवडय़ातून दोन दिवस म्हणजे सोमवार व गुरुवारी उसाचा घाऊक बाजार भरतो. सकाळी सूर्य उजाडेपर्यंत वाहनातून उसाच्या मोळ्या रस्त्याच्या कडेला येऊन पडलेल्या असतात. सूर्य माथ्यावर येईपर्यंत म्हणजे साडेअकरा-बारावाजेपर्यंत ऊस संपलेला असतो. यावरून उसाला किती मागणी आहे, याचा अंदाज लावता येतो. उसाच्या एका मोळीत साधारण २५ ऊस असतात. काळ्या उसाच्या पाच मोळ्या तर हिरव्या उसाच्या दहा मोळ्या एका गाडीत असतात. या घाऊक बाजारात गाडीप्रमाणे ऊस विकला जातो. हिरवा आणि काळा अशा दोन्ही प्रकारचा ऊस मिळतो. हिरव्या उसाच्या तुलनेत काळा ऊस हा महाग असतो. काळ्या उसात गोडवा अधिक असतो, असे याचे कारण सांगितले जाते. नागपुरात आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशातील कटनी, पांढुर्णा, लखनादौन, जबलपूर, विदर्भातील सावनेर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नांदुरा व मराठवाडा परिसरातून ऊस विकायला येतो. काही शेतकरी स्वत:च माल आणत असले तरी त्यांची संख्या कमीच असते. मध्यस्थच थेट खरेदी करून ट्रकमधून माल आणतात. सध्या नागपुरात आठवडय़ाला सुमारे बारा ते पंधरा ट्रक ऊस येतो आहे. उन्हाळा वाढेल तशी मागणीही वाढेल. मात्र, असे असले तरी त्यावेळी आठवडय़ाला सुमारे वीस ते तीस ट्रकच माल येतो, अशी माहिती घाऊक विक्रेत्यांनी दिली.
उसाच्या मोळ्यांची बोली लागत असली तरी सध्या मालाची आवक किती यावर ती अवलंबून असते. माल जास्त असेल तर भावही थोडेबहुत कमी असतात. सध्या काळा उसाचा घाऊक दर सुमारे साडेचार हजार रुपये गाडी असून हिरव्या उसाचा घाऊक दर सुमारे अडीच हजार रुपये आहे. त्यातही ऊस बारिक असेल तर तो दोन ते सव्वादोन हजार रुपयात पडतो, असे शेखर बागडे या विक्रेत्याने सांगितले. तीस वर्षांपूर्वी तो या बाजारात हमाली करू लागला. त्यातून या व्यवसायातील बारकावे समजू लागले. त्याने हमाली सोडून खरेदी-विक्री सुरू केली. आता तर बाजारात रसवंतीही सुरू केली आहे. मार्च ते जुलैपर्यंत हा हंगाम चालतो. पावसाळा सुरू झाला की मालाची आवकही कमी होते आणि त्याचे भावही घसरतात. केवळ चार महिन्यांचा हा हंगाम अनेकांना रोजगार मिळवून देतो, असे तो म्हणाला. रसवंती सुरू करणारा मालक तसेच साधारण एक मदतनीस असे किमान दोघांना रसवंतीत रोजगार मिळतो. शहरातील रसवंतींची संख्या पाहता प्रत्यक्षरित्या एक हजार जणांना रोजगार मिळतो.  
साधारण दहा रुपये प्याला उसाचा रस विकला जातो. एका उसात साधारण पाच प्याले रस निघतो. त्यात बर्फ मिसळला तर त्याचे प्रमाण वाढते. इंधन व इतर खर्च वगळला तर दोन रुपये सहज नफा मिळून जातो, असे या व्यवसायातील ‘अर्थ’कारण असल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. दहा रुपये भाव ग्राहकाला परवडणारा आहे. त्यामुळे ग्राहकांची गर्दी असतेच असते. नफा देणारा हा व्यवसाय असला तरी त्यासाठी घाम गाळावाच लागतो, असेही या विक्रेत्याने स्पष्ट केले.

84 thousand electricity connections have been provided to customers of all categories in last year
नागपूर: वर्षभरात ८४ हजार नवीन वीज जोडण्या; ई- वाहनांच्या चार्जिंग स्टेशनसाठीही…
Due to summer the price of lemon continues to increase
उन्हामुळे लिंबाची दरवाढ कायम
Change in traffic route due to Rath Yatra after ram navami in nashik
नाशिक : रथयात्रेमुळे वाहतूक मार्गात बदल
increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ