ऊसदरवाढ प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोलापूर जिल्ह्य़ास चालविलेल्या आंदोलनाला काही तालुक्यांमध्ये हिंसक वळण लागले तरी त्याचा परिणाम साखर कारखान्यांच्या ऊसगाळप हंगामावर होत नसल्याचे दिसून आले. जवळपास सर्व साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरळीतपणे सुरू असून यात आतापर्यंत ११ लाख ६० हजार मे. टन उसाचे गाळप झाले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्य़ात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदरवाढीसाठी तीव्र आंदोलन छेडले होते. यात शेतकरी कार्यकर्त्यांनी साखर कारखान्यांकडे गाळपासाठी जाणारी ऊस वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. अनेक भागात ऊसवाहतूक अडवून वाहनांच्या चाकांची हवा सोडणे, टायर फोडणे आदी प्रकार घडल्यामुळे तसेच काही भागात हिंसक प्रकार घडल्यामुळे बहुसंख्य कारखान्यांनी पोलीस संरक्षण घेत ऊस वाहतूक अवलंबली. परिणामी आंदोलनाची व्याप्ती वाढू शकली नाही.
या पाश्र्वभूमीवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मर्यादा येत असताना दुसरीकडे साखर कारखान्यांचे गळीत हंगाम ठप्प न होता सुरूच राहिले. ऊसदर आंदोलनाचा फटका प्रामुख्याने माढा, करमाळा, पंढरपूर, माळशिरस या तालुक्यांमध्ये बसला असला तरी या संवेदनशील तालुक्यांसह जवळपास सर्वच भागातील साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला खंड पडला नाही.
जिल्ह्य़ात आतापर्यंत २१ पैकी संत कूर्मदास (ता.माढा) व सांगोला शेतकरी (सांगोला) या दोन साखर कारखान्यांचा अपवाद वगळता उर्वरित सर्व साखर कारखान्यांच्या गळीत हंगामात ११ लाख ६० हजार मे.टन ऊस गाळप होऊन १० लाख ५१ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. यात सरासरी ८.५४ टक्के साखर उतारा मिळाला आहे.
जिल्ह्य़ात सर्वाधिक दोन लाख मे. टन उसाचे गाळप माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने केले, तर त्याखालोखाल अकलूजच्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील साखर कारखान्याने एक लाख ६० हजार मे. टन उसाचे गाळप केले. अन्य साखर कारखान्यांनी केलेल्या ऊस गाळपाची माहिती अशी: श्री शंकर, सदाशिवनगर-८८ हजार, पांडुरंग, श्रीपूर-९७ हजार, दि सासवड, माळीनगर-४७ हजार, चंद्रभागा, भाळवणी-४३ हजार, विठ्ठल, पंढरपूर-७५  हजार, भीमा-टाकळी सिकंदर-८० हजार, लोकनेते, अनगर-६६ हजार, विठ्ठल शुगर,म्हैसगाव-५४ हजार, आदिनाथ, करमाळा-७५ हजार, मकाई, करमाळा-२५ हजार, संत दामाजी, मंगळवेढा-२५ हजार, लोकमंगल, सोलापूर-२६ हजार, लोकमंगल, भंडारकवठे-५२ हजार, श्री सिध्देश्वर, सोलापूर-५१ हजार, स्वामी समर्थ, अक्कलकोट-१२ हजार. ऊजल्ह्य़ात गाळप झालेल्या एकूण ११ लाख ६० हजार मे. टन उसाच्या मोबदल्यात १० लाख ५१ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून यात ८.५४ टक्के सरासरी साखर उतारा मिळाला आहे. सर्वाधिक १०.३१ टक्के  साखर उतारा माढय़ाच्या विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने घेतला असून त्याखालोखाल १०.१६ टक्का साखर उतारा भीमा साखर कारखान्याने घेतला आहे. तर, पांडुरंग साखर कारखान्याने १० टक्के साखर उतारा घेतला आहे. अकलूजच्या सहकार महर्षी साखर कारखान्याला ९.४७ टक्के साखर उतारा मिळविता आला.