मांजरा परिवाराने उसाचा पहिला हप्ता २ हजार २५० रुपये देण्याची घोषणा केल्यानंतर जिल्ह्य़ातील सर्वच कारखान्यांनी ‘मांजरा’च्या पावलावर पाऊल टाकण्याचा निर्णय घेतल्यामुळे ऊस उत्पादकांत या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
जिल्ह्य़ात मांजरा साखर कारखान्यापेक्षा अन्य कारखान्यांच्या उसाचा भाव सातत्याने कमी राहत असे. ऊसउत्पादकांत जागृती होऊ लागली तेव्हा कारखाने सतर्क झाले. आता सर्वच कारखाने स्पर्धेत उतरू लागले आहेत. या वर्षी पहिल्यांदाच मांजरा, विकास, रेणा, प्रियदर्शनी, मारुती महाराज, किल्लारी, जागृती, साईबाबा शुगर्स, पन्नगेश्वर शुगर मिल व सिद्धी या १० साखर कारखान्यांनी पहिला हप्ता २ हजार २५० रुपये देण्याचे जाहीर केले आहे. यातील किती कारखाने जाहीर केलेला भाव शेतकऱ्याला देतील हे गुलदस्त्यात असले, तरी २ हजार २५० भाव जाहीर केला नाही तर शेतकरी आपल्या कारखान्याला ऊस देणार नाहीत, हे लक्षात घेऊन कारखान्यांनी भाव जाहीर केले आहेत.
या वर्षी मांजरा परिवाराने घेतलेल्या निर्णयावर सर्वाचे एकमत झाले आहे, ही जिल्ह्य़ातील ऊस उत्पादकांच्या दृष्टीने जेमची बाब आहे. शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनाचा परिणाम शेतकऱ्याला चांगला भाव देण्यास कारखाने तयार झाले आहेत, हे यावरून दिसून येते.