बेरोजगार निर्माण करणारी शिक्षण पद्धती बदला, सरसकट सर्व विद्यार्थ्यांंना आठवी उत्तीर्ण करण्याची पद्धत बंद करा, यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्त्या वाढत आहेत, सेट-नेट परीक्षेच्या सतत निकष बदलणाऱ्या व किचकट पद्धतीत बदल करा, डीएड-बीएड.साठी लवकर सीईटी घ्या, असे प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सध्याच्या शिक्षण पद्धतीबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे रोष व्यक्त केला.
राष्ट्रवादी भवनात आज खा. सुळे व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार मधुकर पिचड यांच्या उपस्थितीत जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली, त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी या भावना व्यक्त केल्या. पालकमंत्री बबनराव पाचपुते, राज्यमंत्री फौजिया खान, युवकचे प्रदेशाध्यक्ष आमदार उमेश पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष आमदार विद्या चव्हाण, आमदार चंद्रशेखर घुले, जि. प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार आदी उपस्थित होते.
विद्यार्थी व युवती पदाधिकाऱ्यांना बोलते करुन सुळे यांनी प्रश्न जाणून घेतले. कविता जगदाळे (जामखेड) हिने उपस्थित केलेल्या डीएड-बीएडच्या सीईटी केव्हा होणार या प्रश्नावर राज्यमंत्री खान यांनी राज्यात शाळांची पटपडताळणी झाल्याने शिक्षकांचे समायोजन सुरु आहे, त्याशिवाय भरती करता येणार नाही, समायोजनाची प्रक्रिया गतीमान करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्याचे त्यांनी मान्य केले. सेट-नेटच्या परीक्षेबाबत बोलतानाही खान यांनी शिक्षकांचा व शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठीच या परीक्षेचे निकष बदलले गेले आहेत, महाराष्ट्रातील शिक्षणाचा दर्जा कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे, परंतु तरीही ही मागणी उच्च शिक्षण विभागास कळवू, असे स्पष्ट केले.
संगमनेरची अश्विनी खरात, भाऊसाहेब शिंदे (गुंडेगाव, नगर), मंगल पवार यांनी विविध शैक्षणिक प्रश्न उपस्थित केले. मात्र, त्यावर उत्तरे मिळाली नाहीत.
युवतींच्या विविध मागण्या
गावात दारुबंदी करण्यासाठी मदत करा, मुलींना शाळेत खेळासाठी स्वतंत्र मैदान ठेवा, स्वसंरक्षणासाठी मुलींसाठी कराटेचे क्लास सुरु करा, तालुका पातळीवरील महिला दक्षता समित्या सक्षम करा, शाळा, कॉलेजसाठी विद्यार्थीनीसाठी स्वतंत्र बस सुरु करा, अशा विविध मागण्याही युवतींनी केल्या.
पदाधिकाऱ्यांची मनमोकळी कबुली
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी मनमोकळेपणे जिल्ह्य़ात संघटनेस मरगळ आली आहे, आम्ही काम करण्यात कमी पडलो, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रशिक्षण नाही, संघटनेत सुसूत्रता नाही, जिल्ह्य़ात
संघटन उभे राहू शकले नाही, त्यामुळे पदाधिकारी बदला, अशी मागणी करत होते.