सहल घडविणाऱ्या एजंटाने यात्रेकरूंचा आग्रह मोडून काढत अचानक बिघडलेले वातावरण व लष्करातील जवानांनी दिलेला इशारा लक्षात घेऊन गौरीकुंडाहून परतण्याचे ठरविले. त्यामुळेच उस्मानाबादमधील ३२ प्रवासी उत्तराखंड येथून सुखरूप परतू शकले. दुर्घटनेच्या केवळ ६ तास आधी गौरीकुंड सोडल्यामुळेच बालंबाल बचावलो, अशी भावना सुखरूप परतलेल्या यात्रेकरूंनी भारावलेल्या मनाने व्यक्त केली.
उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव येथील रामेश्वर ठेले मागील २० वर्षांपासून उत्तर व दक्षिण भारतात सहलींचे आयोजन करतात. आजवर २० वेळा ते केदारनाथला जाऊन आले. तेथील वातावरण, अचानक येणारा पाऊस, डोंगरावरून घसरत येणारा मलबा, रस्त्यांवर कोसळणाऱ्या दरडी याचा त्यांनी अनेकदा अनुभव घेतला आहे. मात्र, आताची दुर्घटना ‘न भुतो न भविष्यती’ असल्याचे ते म्हणाले.
उस्मानाबाद, तुळजापूर तालुक्यातील ३२ यात्रेकरूंनी २२ दिवसांच्या सहलीकरिता ठेले यांच्याकडे चार महिने अगोदर नोंदणी केली होती. सोलापूर येथून रेल्वेने त्यांची सहल सुरू झाली. १५ जूनला दुपारी सर्व यात्रेकरू उत्तराखंड येथील गौरीकुंडला पोहोचले. दरम्यान, पावसाच्या सरी सतत कोसळत असल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर दरडी कोसळल्या. स्थनिक पोलिसांकडून सावधानतेचा इशाराही दिला जात होता. वातावरणात अचानक झालेला बदल व स्थानिक पोलिसांनी दिलेली धोक्याची सूचना ध्यानात घेऊन गौरीकुंडहून परत फिरण्याचे ठेले यांनी ठरविले. त्यांच्या निर्णयाला सर्व यात्रेकरूंनी विरोध करीत इथपर्यंत आलो आहोत. आता केदारनाथ केवळ १४ किलोमीटर अंतरावर असताना कशाला परतायचे? वाटल्यास प्रतिव्यक्ती दोन हजार रुपये घ्या, परंतु यात्रा पूर्ण करू यात, असा आग्रह यात्रेकरूंनी धरला. परंतु त्यास न बधता वातावरणाचा अंदाज घेऊन ठेले यांनी परत फिरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच सर्वाना सुखरूप परत आणता आले. अन्यथा काय झाले असते, याची कल्पनाही करवत नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदविली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Survive to leave gaurikund in proper time
First published on: 25-06-2013 at 01:53 IST