‘ढाबळ’ म्हणजे नेमकं काय? मित्रांचा अड्डा, टाइमपासचा कट्टा की एखाद्याला बाजूला घेऊन राग देण्याची जागा की आणखी काही. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठीसुद्धा आपल्याला अभिनेता स्वप्नील जोशीची वाट पहावी लागणार आहे. छोटय़ा पडद्यावर ‘एका लग्नाची गोष्ट’ गाजवून झाल्यावर ‘दुनियादारी’ करत प्रेक्षकांचा ठाव घेणारा स्वप्नील लवकरच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पहायला मिळणार आहे. ‘स्टार प्रवाह’वर सुरू होणारा ‘ढाबळ : एक तास टाइमपास’ हा शो काल्पनिक मालिका आणि रिअॅलिटी शो यांच्यामधली काही वेगळीच संकल्पना असल्याचे स्वप्नीलने ‘वृत्तान्त’ शी बोलताना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ढाबळ’ या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी ‘ढाबळ’ ही संकल्पना मित्रांची अशी खास जागा म्हणून वापरली जाते. तो अड्डाच असायला हवा, असे नाही. त्यामुळे मीही प्रेक्षकांना माझ्या ढाबळीत घेऊन जाणार आहे जिथे मी सूत्रसंचालक अजिबात नाही, परीक्षक तर नाहीच नाही. पण, मी कधी सूत्रधार असेन, कधीतरी मीच त्या कथेचा नायक असेन. कधी तुमच्या घरातील सदस्य असेन.
अगदी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये मी या शोमधून दिसणार आहे. या शोचे स्वरूपच पूर्णपणे वेगळे असल्याचे स्वप्नीलने सांगितले. ‘ढाबळ’ असे विचित्र नाव असले तरी या हटके नावामुळेच प्रेक्षक या शोशी जोडले जातील आणि एकदा ढाबळीतले झाल्यावर शोबरोबरच हे नावही घराघरात लोकप्रिय होईल, असा विश्वासही स्वप्नीलने यावेळी बोलताना व्यक्त केला.
‘ढाबळ : एक तास टाइमपास’ हा शो आजवरच्या मराठी वाहिन्यांवरील कार्यक्रमांपेक्षा वेगळा असून त्याची संकल्पना, लेखन आणि निर्मिती श्रीरंग गोडबोले यांची आहे. एक तास प्रेक्षकांना हलक्याफुलक्या विनोदी ‘ढाबळी’त नेणाऱ्या शोचे दरवाजे १२ मेपासून खुले होणार असल्याची माहिती वाहिनीच्या सूत्रांनी दिली.

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swapnil joshi in new marathi serial
First published on: 16-04-2014 at 06:51 IST