‘लोकसत्ता’ आयोजित कार्यक्रमाला लोकांची पसंती
संगीतातील दर्दी रसिकांना नवीन वर्षांची स्वरभेट देण्यासाठी आयोजित केलेल्या ‘स्वरांजली’ या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सप्तसुरांची उधळण झाली. नेहरू केंद्राच्या सभागृहात गुरुवारी संध्याकाळी सुरू झालेल्या या तीनदिवसीय महोत्सवाची सुरुवात मालिनी राजुरकर यांच्या गायनाने झाली. तसेच या दिवशी पं. शिवकुमार शर्मा यांच्या संतूर वादनानेही श्रोत्यांना मुग्ध केले.
‘स्वरांजली’च्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या पर्वाची सुरुवात मालिनी राजुरकर यांनी दिवेलागणीच्या वेळी आळवल्या जाणाऱ्या यमन रागाने केली. ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका असलेल्या राजुरकर यांनी यमन रागाचे सौंदर्य श्रोत्यांसमोर उलगडले. त्यानंतर त्यांनी हमीर रागातील एक टप्पा सादर केला. अत्यंत प्रभावी मांडणी, आलाप आणि तानांमधील सहजता यांमुळे राजुरकर यांनी श्रोत्यांना अक्षरश: दैवी अनुभव दिला. या पर्वाच्या अखेरीस मालिनीताईंनी काफी रागातील एक टप्पा सादर केला. दुसऱ्या पर्वाच्या सुरुवातीलाच पं. शिवकुमार शर्मा यांनी आज आपण श्रोत्यांना वेगळीच अनुभूती देणार असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी काही अनवट राग सादर करत श्रोत्यांना ‘संगीत आणि शांती’ यातील अद्वैत दाखवून दिले. कार्यक्रमाच्या अखेरीस त्यांनी दादऱ्यातली एक चीज संतूरवर अत्यंत प्रभावीपणे वाजवून श्रोत्यांना खिळवून ठेवले.