प्रजनन काळात वाघिणीला त्रास होऊ नये आणि वनखात्यात नव्याने दाखल झालेल्या गाईडला प्रशिक्षण देण्यासाठी म्हणून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रातील वनभ्रमंती पर्यटकांना दोन महिन्यासाठी तात्पुरती बंद करण्यात आली आहे. ताडोबा व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे पर्यटकांमध्ये नाराजीची भावना आहे
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे एकूण क्षेत्र ५७१.८२ चौ.कि.मी असून या विभागात चंद्रपूर बफर, मोहुर्ली, मूल, शिवणी, पळसगाव, खडसंगी, असे एकूण सात वनपरिक्षेत्र आहेत. ते चंद्रपूर, मूल, सिंदेवाही व चिमूर या चार तालुक्यात पसरलेले आहेत. बफर क्षेत्रातील वन घनदाट व जैविक विविधतेने समृध्द आहे. वाघांच्या अस्तित्वाने मध्य भारतातील क्रमांक एकचा व्याघ्र प्रकल्प ठरलेला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा कोर व बफर, अशा दोन क्षेत्रात विभागला गेला आहे. बफर झोनमध्ये ६ छाव्यांसह २७ पट्टेदार वाघांची नोंद घेण्यात आलेली आहे. सध्या बफर क्षेत्रात वाघांचे हमखास दर्शन होत असल्याने देशविदेशातील पर्यटकांची येथे गर्दी होत आहे. तर बफर क्षेत्रातील तेलिया डॅमवर पट्टेदार वाघीण तिच्या चार पिल्लांसह हमखास दर्शन देत आहे. बफर क्षेत्रात वन्यप्राण्यांची गर्दी झाली असल्यानेच पर्यटकांचा कलसुध्दा निसर्गरम्य वातावरणात फिरण्याकडे असल्यानेच ताडोबा बफर क्षेत्र लोकप्रिय झाले आहे. त्याचा परिणाम बफर क्षेत्रातील प्रजनन काळात असलेल्या वाघिणीला जिप्सी व पर्यटकांचा त्रास होत आहे. पर्यटकही वाघिणीला चारही बाजूने घेरतात, तसेच वनखात्याच्या सर्व नियमांचे उल्लंघन पर्यटकांकडून होत आहे. त्यामुळे वाघांसह अन्य वन्यप्राण्यांना पर्यटकांचा त्रास वाढलेला आहे. गेल्या आठवडय़ात तर अशा अनेक घटना वन अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत झाल्याने ताडोबा बफर व्यवस्थापनाने बफर क्षेत्र दोन महिन्यासाठी तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यात म्हणजेच, ३० जुलैपर्यंत तरी बफर क्षेत्र बंद राहील, अशी माहिती ताडोबा बफरचे उपवनसंरक्षक नरवणे यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.   पर्यटकांमुळे वाघ, बिबटच नाही, तर रानडुकर, अस्वल, रानकुत्रे, कोल्हे, मांजूर, रानमांजर, निलगाय, सांबर, चितळ यांना सुध्दा त्रास वाढला असल्याने हा निर्णय घेण्यात आला. तसेच ताडोबा बफर क्षेत्रातील गाईडस् प्रशिक्षित नाहीत. त्यामुळे गाईडस्ना या दोन महिन्याच्या कालावधीत प्रशिक्षण देण्यात येणार असून बफर क्षेत्रात नेमक्या किती पर्यटकांच्या गाडय़ा सोडायच्या, याचा अभ्यास सुध्दा या कालावधीत करण्यात येणार आहे. एकदा गाडय़ांची संख्या निश्चित झाली व गाईड प्रशिक्षित झाले की, बफर क्षेत्र पुन्हा पर्यटकांना खुले करू, असेही नरवणे यांनी सांगितले. बफर क्षेत्रात आगरझरी, मोहुर्ली, देवाडा व जुनोना या गावातील ५० गाईडस् कार्यरत असून या सर्वाना मोहुर्ली किंवा आगरझरी येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक तसेच बाहेरच्या स्वयंसेवी संस्थांची सुध्दा मदत घेतली जाणार आहे. बफर क्षेत्रातील नियम, गाडय़ांची संख्या व प्रशिक्षित गाईड तयार झाल्यानंतरच बफर झोन पर्यटकांसाठी पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. ताडोबात सध्या केवळ वाघांचे पर्यटन मोठय़ा प्रमाणात होत आहे, परंतु येथे वाघासोबतच फुल, पत्ती, पक्षी, फुलफाखर सुध्दा मोठय़ा प्रमाणात आहे. त्याचाही अभ्यास लोकांना व्हावा त्या दृष्टीने सुध्दा ताडोबा बफर क्षेत्र प्रयत्नरत आहे, तसेच वन्यप्राण्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने सुध्दा उपाययोजना केली जात आहे. बफर झोन बंद केल्याने वन्यप्रेमी व पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असली तरी येत्या काळात पर्यटकांसाठी अधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठीच प्रकल्प तात्पुरता बंद करण्यात आला असल्याने पर्यटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ताडोबा बफर झोनच्या वतीने करण्यात
आले आहे.