महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत मागील सहा वर्षांत धुळे जिल्ह्यातील एकुण २२३ गावे तंटामुक्त म्हणून जाहीर झाली असली तरी येथील एकाही गावाची आजतागायत विशेष पुरस्कारासाठी निवड होऊ शकलेली नाही. जिल्ह्यातील तंटामुक्तीसाठी पात्र ठरलेल्या गावांची संख्या लक्षात घेतल्यास अद्याप ३२१ गावे तंटामुक्त होणे बाकी असल्याचे दिसून येते.
ग्रामीण भागातील तंटा-बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. तंटामुक्त गाव मोहिमेचे २०१३-१४ हे सातवे वर्ष. मागील सहा वर्षांतील धुळे जिल्ह्याच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास सुमारे ३५ टक्के गावे तंटामुक्त झाल्याचे लक्षात येते. ज्या वर्षी या मोहिमेचा शुभारंभ झाला, म्हणजे २००७-०८ मध्ये या जिल्ह्यातील ३१ गावे तंटामुक्तीसाठी पात्र ठरली तर एकाही गावाची विशेष पुरस्कारासाठी निवड झाली नाही. त्यानंतर २००८-०९ मध्ये धुळ्याची कामगिरी खाली घसरली. तेव्हा केवळ २७ गावे तंटामुक्त म्हणून जाहीर झाली.
मोहिमेच्या तिसऱ्या वर्षांत २००९-१० मध्ये धुळ्यातील ४२ गावे तंटामुक्तीसाठी पात्र ठरली. त्यावेळी एकाही गावास शांतता पुरस्कार मिळाला नाही.
२०१०-११ या चवथ्या वर्षांत धुळ्याच्या कामगिरीचा आलेख पुन्हा खाली गेला. या वर्षांत केवळ १९ गावे तंटामुक्त म्हणून जाहीर झाली. तेव्हा देखील एकही गाव विशेष पुरस्कारासाठी पात्र ठरले नाही. २०११-१२ या पाचव्या वर्षांत धुळ्याच्या कामगिरीत लक्षणिय सुधारणा झाली. ७२ गावे तंटामुक्त गाव म्हणून जाहीर झाली. २०१२-२०१३ मध्ये ही आकडेवारी पुन्हा एकदा घसरली. केवळ ३२ गावे पुरस्कारासाठी पात्र ठरली.
या जिल्ह्यातील एकही गाव संपूर्ण सहा वर्षांत विशेष पुरस्कारासाठी पात्र ठरले नसल्याचे गृह विभागाच्या अहवालावरून दिसून येते. आजवरच्या कामगिरीवर नजर टाकल्यास धुळे जिल्ह्यात मोहिमेत सहभागी होणाऱ्या ५५० गावांपैकी २२३ गावे तंटामुक्तीसाठी पात्र ठरली आहेत. यावरून अद्याप ३२१ गावे तंटामुक्त होणे बाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onधुळेDhule
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tantamukti village campaign
First published on: 08-04-2014 at 07:19 IST