पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले की तातडीने टॅक्सी आणि रिक्षाचेही दर वाढतात. या न्यायाने गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलचे दर खूप कमी झाले आहेत, यामुळे रिक्षा आणि टॅक्सीचे दरही कमी व्हावेत अशी सामान्य प्रवाशांच्या भावना आहेत. त्यांच्या या भावनेला वाचा फोडण्यासाठी थेट टॅक्सी मालक-चालक संघटनाच पुढे सरसावली असून त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून टॅक्सी, रिक्षाचे दर कमी करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीवर इतर संघटनांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. सहकार टॅक्सी मालक-चालक संघटनेने सामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली आहे. एप्रिल २०१४पासून पेट्रोल व डिझेलचे भाव पाच वेळा कमी झाले असून पेट्रोल ८१ रुपयांवरून ६१.५० रुपयांपर्यंत कमी झाले तर डिझेलचा दर ६४ रुपयांवरून ५०.५० पैसे इतका झाला आहे. यामुळे टॅक्सी व रिक्षाचे दर कमी करून प्रवाशांना दिलासा द्यावा असे पत्र सहकार टॅक्सी मालक-चालक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास लोखंडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. लोखंडे यांच्या या भूमिकेला मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियनने विरोध दर्शविला असून रिक्षा आणि टॅक्सीचे दर हे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर अवलंबून नसून ते राहणीमान खर्च आलेखावर अवलंबून असतात. तसेच २००४पासून शहरातील रिक्षा आणि टॅक्सी सीएनजीवर चालत आहेत. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा रिक्षा आणि टॅक्सीच्या दरांवर परिणाम होत नसल्याचे मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियनचे पदाधिकारी शशांक राव यांनी स्पष्ट केले. तसेच जे कुणी अशाप्रकारे दर कमी करावे असे म्हणत असतील तर अशा लोकांना संघटना चालविण्याचा अधिकार नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
संग्रहित लेख, दिनांक 14th Feb 2015 रोजी प्रकाशित
रिक्षा, टॅक्सीचे दर कमी करण्यावरून संघटना आमने- सामने
पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले की तातडीने टॅक्सी आणि रिक्षाचेही दर वाढतात. या न्यायाने गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलचे दर खूप कमी झाले आहेत,

First published on: 14-02-2015 at 01:30 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taxi rickshaw union memebers meet chief minister for reducing fare