परीक्षेच्या ऑटोमेशन करण्याच्या प्रक्रियेमध्ये पुणे विद्यापीठाने अजून एक पाऊल उचलले असून नुकत्याच झालेल्या अभियांत्रिकी शाखेच्या प्रश्नपत्रिकांचे वितरणही ‘ऑनलाईन’ करण्यात आले. ही प्रक्रिया अत्यंत यशस्वी झाल्याचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी बुधवारी सांगितले.
गेले काही महिने परीक्षा पद्धतीचे ऑटोमेशन करण्याबाबत पुणे विद्यापीठ काम करत आहे. परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी परीक्षा पद्धतीचे संपूर्ण ऑटोमेशन करण्यात यावे असा अहवाल शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यानुसार परीक्षा अर्ज स्वीकारणे, प्रवेश पत्रांचे वितरण करणे अशा परीक्षापूर्व कामांचे पुणे विद्यापीठाने ऑटोमेशन केले होते. आता परीक्षा केंद्रावर ऑनलाइन प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचा प्रयोग विद्यापीठाने नुकताच केला. नुकत्याच झालेल्या अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर सव्‍‌र्हरच्या माध्यमातून पाठवण्यात आल्या. परीक्षेच्या वेळेपूर्वी साधारण एक तास आधी प्रत्येक केंद्रावर प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यानंतर प्रत्येक केंद्रावरच त्याच्या प्रिंटआऊट काढून त्या विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आल्या. प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून घेण्यासाठी प्रत्येक परीक्षाकेंद्रावर एका समन्वयकाची नेमणूक करून त्याला पासवर्ड देण्यात आला होता. परीक्षा समन्वयक, परीक्षा केंद्र असलेल्या महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्यावर प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षित पद्धतीने प्रिंटआऊट काढून त्या विद्यार्थ्यांना वेळेवर वितरित करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. याबाबत डॉ. गाडे म्हणाले, ‘‘परीक्षा प्रक्रियेचे ऑटोमेशन हे अत्यावश्यक आहे. यावेळी अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षांच्या वेळी प्रश्नपत्रिका ऑनलाइन वितरित करण्यात आल्या. प्रश्नपत्रिका ऑनलाइन वितरित करण्यापूर्वी सुरक्षेची सर्व काळजी घेण्यात आली होती. कोणत्याही अडचणी न येता परीक्षा झाल्या.’’