दलितांना मंदिर प्रवेशापासून रोखल्याप्रकरणी कळंबे तर्फ ठाणे येथील सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्षासह १४ नागरिकांना मंगळवारी करवीर पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर उभे केलेअसता जामिनावर मुक्तता करण्यात आली.
करवीर तालुक्यातील कळंबे तर्फ ठाणे येथे नवरात्रोत्सवाच्या काळात गावातील दलितांना महादेवमंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यापासून ग्रामस्थांनी रोखले होते. त्यातून दलित-सवर्ण असा वाद झाला होता. तेंव्हापासून दलितांना असहकार्याची भूमिका घेतली होती. याप्रकरणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तहसीलदार यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. तर आरपीआय आठवले गटाने गावात जाऊन आंदोलन केले होते.
या घडामोडींची दखल घेऊन करवीर पोलीस ठाण्यामध्ये दोन दिवसांपूर्वी गावातील १६ जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार सरपंच मधुकर गुरव, उपसरपंच कृष्णा पाटील, तंटामुक्ती समितीचेअध्यक्ष भगवान पाटील, ग्रामपंचायत सदस्य सदाशिव भाडीसरे यांच्यासह १४ जणांना अटक करण्यात आली.