ठाणे स्थानकात हद्दीच्या वादामुळे फेरीवाल्यांचा जाच सुरूच.
 फेरीवाले आणि पोलीस यांच्यातील अर्थपूर्ण संबंधांची प्रकरणे उजेडात येत असतानाच ही स्थानके लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्याही हिटलिस्टवर आहेत. हप्तेखोरीचे हे वृत्त मंगळवारी ‘लोकसत्ता’च्या ठाणे वृत्तान्तमध्ये प्रसिद्ध झाल्याने हप्तेखोरांचे धाबे दणाणले आणि कधी नव्हे ती कारवाईला सुरुवात झाली. ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या गाडीने गोखले मार्गावरील फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारत त्यांना हुसकावून लावले. तर कल्याणचे लोकल ‘मार्केट’ ठरलेले स्कायवॉक बुधवारी पहिल्यांदाच फेरीवालामुक्त झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मात्र ठाणे स्थानकातील फेरीवाल्यांना हुसकावण्यामध्ये मात्र रेल्वे सुरक्षा दल आणि ठाणे महापालिका सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र असून प्रवासी महापालिका, रेल्वे प्रशासन, पोलीस आणि खासदारांच्या नावाने शिव्यांच्या लाखोल्या वाहत आहे.
फेरीवाल्यांच्या विळख्यात अडकलेल्या रेल्वे स्थानकांचा परिसर प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत असून या फेरीवाल्यांना हुसकवणारी यंत्रणा मात्र थंड पडल्याचे एकूण चित्र होते. त्यामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवलीबरोबरच ठाणेपल्याडच्या छोटय़ा स्थानकांमध्ये मोठय़ा प्रमाणात हप्तेखोरीचे पेव फुटले आहे. या प्रकरणाच्या तक्रारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे येऊ लागल्याने विभागाने या स्थानकांवर विशेष लक्ष देण्याचे ठरवले आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे येणाऱ्या तक्रारींचे प्रमाणही वाढले असून कारवाईमध्ये पोलीस कर्मचारी अडकू लागले आहेत. या विषयीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर हप्तेखोरांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे मंगळवारी दुपारपासूनच ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाईला सुरुवात झाली. गोखले मार्गावर या पथकाची गाडी दाखल होण्यापूर्वीच अर्धा तास संपूर्ण गोखले मार्गावरील फेरीवाले गायब झाले होते तर अन्य फेरीवाल्यांना या गाडीच्या कर्मचाऱ्यांनी हुसकावून लावले. काहींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. मात्र त्यांची संख्या हातांच्या बोटांवर मोजण्याइतकीच होती. काही फेरीवाल्यांनी तात्काळ रेल्वेच्या हद्दीमध्ये आपली दुकाने थाटल्यानंतर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. अतिक्रमण विभागाच्या गाडीने गोखले मार्ग सोडल्यानंतर अवघ्या काही वेळात फेरीवाल्यांनी पुन्हा रस्त्याचा ताबा घेतला.
कल्याण स्कायवॉकवर व्यवसाय करण्यासाठी मोठे दरपत्रक असून त्यानुसार हप्तेबाजी केली जात आहे. या प्रभागातील एका प्रभाग अधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून त्यास अटकही केली होती. त्यामुळे या भागात पोलिसांइतकीच महापालिका अधिकाऱ्यांचीही हप्तेबाजी सुसाट चालते. मात्र बुधवारी सकाळी कल्याण स्कायवॉक परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्याची मोहीम महापालिका प्रशासनाने सुरू केल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मात्र कारवाईच्या भीतीने अनेक फेरीवाल्यांनी रेल्वे स्थानकाचा आधार घेतला तर रेल्वे सुरक्षा दल मात्र या भागात कारवाईच करत नसल्याने रेल्वे हद्दीत गेल्यानंतर फेरीवाल्यांना पुन्हा अभय मिळत असल्याचे चित्र आहे. फेरीवाल्यांवर सुरू झालेल्या कारवाईचे प्रवाशांच्या वतीने स्वागत होत असले तरी या कारवाईमध्ये सातत्य आल्यास फेरीवाल्यांना चाप बसू शकेल, असा सूर प्रवाशांच्या वतीने व्यक्त केला जात आहे तर पोलीस प्रशासन या कारवाईपासून दूर असल्याने त्यांच्या भूमिकेबाबत शंका निर्माण होत आहे, असा आरोप प्रवासी संघटनांच्या वतीने केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane municipal corporation action against illegal hawkers near thane station after news published in loksatta
First published on: 27-11-2014 at 12:48 IST