अंधेरी येथील मिस्त्री अपार्टमेंटमध्ये राहणारे अरविंद आणि स्वप्ना चिटणीस हे दाम्पत्य उपद्रवी आणि महाठग असून त्यांनी सोसायटीतील रहिवाशांना नाकीनऊ आणले आहे, असा दावा सोसायटीने केला आहे.
‘मुंबई वृत्तान्त’च्या २ जानेवारी २०१३ च्या अंकात ‘मानसिक छळवणुकीचं काय?’ या शीर्षकाने स्वप्ना चिटणीस यांचा सोसायटीच्या व्यवस्थापकीय सदस्यांकडून मानसिक छळ होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. सोसायटीच्या सदस्यांनी आपण त्यांच्याशी भांडत असतानाचा एकतर्फी व्हिडिओ ‘यू टय़ूब’वर अपलोड करून आपल्याला मानसिक त्रास दिल्याचा तसेच व्यवस्थापकीय मंडळाची सदस्य असूनही आपले मत कधीच विचारात न घेतल्याने आपण राजीनामा दिल्याचा आरोप चिटणीस यांनी केला होता. मात्र चिटणीस दाम्पत्य खोटे बोलत असून उलट त्यांनीच आपल्या उपद्रवाने सोसायटीच्या सदस्यांनी नाकीनऊ आणले असल्याचा दावा सोसायटीच्या व्यवस्थापकीय मंडळाने केला आहे. काही महिन्यांपूर्वीच नियुक्त झालेल्या व्यवस्थापकीय मंडळात चिटणीस दाम्पत्याचा समावेश झाल्यापासून प्रत्येक सदस्याला त्यांच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. व्यवस्थापकीय मंडळाची नियुक्ती होण्याआधीच या दाम्पत्याने सोसायटीचे ४० हजार रुपये फस्त केले. स्वप्ना भांडखोर असून त्यांनी एका सदस्याला सोसायटीच्या कार्यालयात डांबून ठेवले होते. त्याचाच व्हिडिओ नंतर ‘यूटय़ूब’वर टाकण्यात आला. त्यांचे खरे रूप दाखविण्याच्या हेतूनेच हे करण्यात आले, असेही सोसायटीचे म्हणणे आहे. या दाम्पत्याकडून सोसायटीतील प्रत्येक सदस्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात येते. अनेकदा त्याबाबत पोलिसांत तक्रारीही करण्यात आल्या आहेत. आता हे दाम्पत्य ‘यूटय़ूब’वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडिओचा दाखला देत आमची सोसायटीकडून मानसिक छळवणूक केली जात असल्याचा खोटा आरोप करीत असल्याचेही सोसायटीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या पाश्र्वभूमीवर आता पोलिसांत तक्रार करण्याऐवजी त्यांना बहिष्कार करण्याचा निर्णय सोसायटीने घेतला असल्याचे सोसायटीतर्फे सांगण्यात आले.