अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे यांनी पुणेकरांबाबत केलेले विधान अशोभनीय तर आहेच आणि त्यांचे गणितही कच्चे आहे, असा आरोप करत झुरमुरे यांना सोमवारी महापालिका सभेत नगरसेवकांनी लक्ष्य केले.
पुणेकर प्रतिदिन माणशी ३९५ लिटर पाणी वापरतात, हे झुरमुरे यांचे विधान चर्चेसाठी गृहित धरले आणि शहर, समाविष्ट गावे व अन्य ठिकाणच्या पाणीपुवठय़ाचा विचार केल्यास वर्षांला २९.९० टीएमसी पाणी लागेल. हा आकडा बघितला, तर झुरमुरे यांचे गणित कच्चे असल्याचेच दिसते, अशी टीका मनसेचे बाळा शेगडे यांनी सभेत केली. पुणेकरांनी कररूपाने दिलेल्या पैशांतून पगार घ्यायचा आणि पुणेकरांनाच ते माजलेत असे म्हणायचे या प्रकाराचा निषेधच केला पाहिजे, असे अरविंद शिंदे म्हणाले.
झुरमुरे यांनी यापूर्वीही अशीच बेताल वक्तव्य केली होती. काहीवेळा त्याबद्दल माफीही मागितली होती, असे सुभाष जगताप यांनी सांगितले. झुरमुरे यांनी सांगितलेल्या ३९५ लिटर या आकडय़ाला काय आधार आहे, असा प्रश्न बाबू वागसकर यांनी उपस्थित केला. झुरमुरे हे महापालिकेतील सेवकांनाही अशाच प्रकारे वागणूक देतात. त्यांनी पुणेकरांची माफी मागितली, तरीही त्यांनी केलेला अपमान पुसला जाणारा नाही, असे कमल व्यवहारे म्हणाल्या. अविनाश बागवे यांनीही झुरमुरे यांच्या काही वादग्रस्त विधानांची आठवण यावेळी सभेत करून दिली.
पुणेकर नाही, अधिकारी माजलेत
पुणेकर नाही, तर अधिकारी माजलेत. शासनाच्या सेवेतून आलेले अनेक अधिकारी वेळोवेळी अशी वक्तव्य करतच असतात. ते पुण्याचे वाटोळे करायला आले आहेत का, असा प्रश्न प्रा. मेधा कुलकर्णी यांनी यावेळी उपस्थित केला. अशाप्रकारची कोणतीही विधाने पुणेकर कधीच सहन करणार नाहीत, असा इशारा संजय बालगुडे यांनी यावेळी दिला.
झुरमुरे २९ पर्यंत रजेवर
दरम्यान, झुरमुरे सोमवारी सकाळीच रजेवर गेले. ते २९ डिसेंबपर्यंत रजेवर गेले असून त्यांचा कार्यभार अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्याकडे देण्यात आला आहे.
झुरमुरे यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला होता. या खुलाशात ‘मी तसे विधान केलेले नाही. अनावधानाने तसे झाले असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो,’ असा खुलासा त्यांनी दिला असून हा खुलासा सभेत आयुक्त महेश पाठक यांनी वाचून दाखवला.
तसेच आयोजक संस्थनेही झुरमुरे यांनी तसे विधान केले नव्हते, असा खुलासा केल्याचे आयुक्तांनी सांगितले. आयुक्तांनी दिलेल्या या माहितीवरही तीव्र हरकती घेण्यात आल्या. आयुक्तांनी कार्यक्रमाची सीडी ऐकून मगच काय तो निर्णय केला पाहिजे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.