वीतभर लांबीच्या आणि बोटभर व्यासाच्या नळकांडय़ांमध्ये िहदुस्थानी शास्त्रीय संगीताचा सोनेरी भूतकाळ दडला आहे, असे सांगितले तर खोटे वाटेल, मात्र हा गौरवशाली इतिहास आता जगासमोर आला आहे. केंद्रीय अबकारी शुल्क विभागाचे मुंबईचे आयुक्तअमरनाथ शर्मा यांच्या पंचवीस वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे गौहर जान, उस्ताद अल्लादिया खान, बालगंधर्व, भास्करबुवा बखले, भाऊराव कोल्हटकर तसेच दादासाहेब फाळके आदी दिग्गजांचे आवाज प्रकाशात आले आहेत. अठराव्या शतकाच्या शेवटी व एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला फोनोग्राफ म्हणजे आतून मेण असलेल्या नळकांडय़ांच्या (सििलडर) साहाय्याने ध्वनिमुद्रित झालेली, मात्र संग्राहकांनी टाकून दिलेली या दिग्गजांची गाणी मिळवून शर्मा यांनी त्यांना डिजिटायझेशनचा आधुनिक साज चढविला आहे. याच विषयावर त्यांनी व त्यांची मुलगी अनुकीर्ती शर्मा यांनी लिहिलेल्या ‘द वंडर दॅट वाँज द सििलडर’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच केंद्रीय माहिती, प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर व ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल यांच्या हस्ते मुंबईत झाले.
या वेळी मनोगतात शर्मा म्हणाले की, कोलकात्यात पंचवीस वर्षांपूर्वी रस्त्याच्या कडेला रद्दीवाल्याकडे मला काही दुर्मीळ नळकांडय़ा सापडल्या. आपल्या गौरवशाली संगीत परंपरेचा ठेवा असा टाकून दिलेला पाहून वाईट वाटल्याने तशा नळकांडय़ा गोळा करण्याचे मी ठरविले, त्यातून गेल्या २५ वर्षांत मी अशा २०० दुर्मीळ नळकांडय़ा मिळवू शकलो. यामध्ये गौहर जान (बालगंधर्वासोबतच्या नव्हेत) यांच्या गीतांचा समावेश आहे, तसेच जयपूर घराण्याचे ख्यातकीर्त गायक अल्लादिया खाँ यांचा आवाज आजवर कोणीही ऐकलेला नाही, त्यांच्या ठुमरीचे ध्वनिमुद्रण मला मिळाले. बालगंधर्व, भास्करबुवा बखले, भाऊराव कोल्हटकर, पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांची गाणीही मी मिळवू शकलो. बालगंधर्वाचे ‘संगीत सौभद्र’मधील ‘किती सांगू तुला’ हे पद ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात. कोल्हटकरांचे १९०१ मध्ये निधन झाल्याने मला मिळालेले गाणे हे त्यांचे एकमेव उपलब्ध गाणे आहे, यात शंका नाही. या संग्रहात भारतातील सर्वात जुने ध्वनिमुद्रणही आहे, मात्र १८९९ मधील या गाण्याचा गायक अज्ञात आहे. हा सर्व प्रवास मी ‘द वंडर दॅट वाँज द सििलडर’ या पुस्तकात शब्दबद्ध केला असून तो करताना या दिग्गजांचा आशीर्वाद असल्याची अनुभूती मला मिळाली.

फाळकेंचे निवेदन!
भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचणारे दादासाहेब फाळके यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ या पहिल्या चित्रपटाच्या एका खेळापूर्वीचे खुद्द फाळके यांचे निवेदनही शर्मा यांच्या संग्रहात आहे. ..आणि िहदुस्थानी चित्रपटसृष्टीचा पाया रचला गेला.. हे फाळके यांचे खणखणीत आवाजातील शब्द ऐकून थक्क व्हायला होते. या पुस्तकातच एक सीडीही असून त्यात हे सर्व आवाज अनुभवता येतात.

..तर कानसेन व्हा
राजकारणाच्या माध्यमातून सत्ताधारी नेते देशातील नागरिकांचे जीवनमान उंचावतात हे खरे असले तरी का आणि कशासाठी जगायचे याचे उत्तर संगीत, कला व अध्यात्त्मामधूनच मिळू शकते. आपण सर्व जण तानसेन होऊ शकत नाही, मात्र जगण्याचा आनंद लुटायचा असेल तर कानसेन होणे आपल्या हातात आहे. या पुस्तकाने आपल्या महान संगीत परंपरेचे दस्तावेजीकरण करण्याचे मोठे काम केले आहे, अशा शब्दांत प्रकाश जावडेकर यांनी भावना व्यक्त केल्या.