मुख्य धारेतील रंगभूमीला उत्तम नाटय़संहितांबरोबरच ताज्या दमाचे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलावंत मिळावेत यासाठी मराठी नाटय़व्यावसायिक निर्माता संघ  आयोजित दीर्घाक स्पर्धेत सांगलीच्या नवरंग सांस्कृतिक कला मंचने सादर केलेल्या राजन खान यांच्या कथेवर आधारीत ‘तिचे संदर्भ नसलेली गोष्ट’ या दीर्घाकाने सर्वप्रथम बहुमानासह अनेक पारितोषिकांवर आपले नाव कोरले. ‘प्रयास, औरंगाबाद’ या संस्थेचा ‘रिअल इस्टेट’ हा कवी दासू वैद्यलिखित दीर्घाक द्वितीय, मुंबई मराठी साहित्य संघाच्या साहित्य शाखेने सादर केलेला ‘घोसाळकर गुरुजी’ हा दीर्घाक तृतीय विजेता ठरला. शाम पेठकरलिखित ‘दाभोळकरचं भूत’ दीर्घाकास विशेष लक्षवेधी नाटय़प्रयत्न म्हणून गौरवण्यात आले.
नाटय़निर्माता संघाने प्रथमच आयोजिलेल्या या दीर्घाक स्पर्धेत राज्यभरातून ८५ प्रवेशिका आल्या होत्या. पाच केंद्रांवर झालेल्या प्राथमिक फेरीतून मुंबईतील अंतिम फेरीकरता १५ दीर्घाकांची निवड करण्यात आली. ही अंतिम फेरी नुकतीच यशवंत नाटय़संकुलात रंगकर्मीच्या उत्साही उपस्थितीत पार पडली. प्रदीप मुळ्ये, विजय केंकरे आणि राजन ताम्हाणे यांनी अंतिम फेरीचे परीक्षक होते.   
स्पर्धेतील अन्य विजेते असे- सवरेत्कृष्ट दिग्दर्शक : अनंत अंकुश (‘तिचे संदर्भ नसलेली गोष्ट’), सवरेत्कृष्ट लेखक : दासू वैद्य (‘रिअल इस्टेट’- प्रयास, औरंगाबाद), सवरेत्कृष्ट अभिनेता : राजन जोशी (‘तिचे संदर्भ नसलेली गोष्ट’), सवरेत्कृष्ट अभिनेत्री : आरती मोरे (‘मोठी तिची सावली’- मिथक, मुंबई), सवरेत्कृष्ट विनोदी कलाकार : प्रदीप डोईफोडे (‘चुळबूळ’- सूरप्रवाह, वरळी, मुंबई), सवरेत्कृष्ट संगीत : ओमकार दामले- दीपक पोळ (‘तिचे संदर्भ नसलेली गोष्ट’), सवरेत्कृष्ट नेपथ्य : विनायक एरवाडे- सुशील वळंजू (‘तिचे संदर्भ नसलेली गोष्ट’), सवरेत्कृष्ट प्रकाशयोजना : विजय गोळे (‘तिचे संदर्भ नसलेली गोष्ट’), सवरेत्कृष्ट रंगभूषा आणि वेशभूषा : आमोद दोशी (‘आय विटनेस’- अभिषेक थिएटर, महाड).