इचलकरंजी येथे गावभागातील अंबाबाई मंदिरातील देवीचे सुमारे ५० हजार रुपये किमतीचे दागिने चोरटय़ांनी मंगळवारी पहाटे लंपास केले. सलग दुसऱ्या दिवशी मंदिरात चोरीचा प्रकार घडल्याने भाविकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. गावभागातील मध्यवर्ती ठिकाणी महादेव, रेणुका, अंबाबाई अशी स्वतंत्र मंदिरे आहेत. तसेच एक दर्गा आहे. सोमवारी रात्री मंदिर बंद करण्यात आले होते. चोरटय़ांनी मध्यरात्रीच्या सुमारास मंदिराच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला. देवीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे किरीट, छत्री, कमरपट्टा या दागिन्यांसह दानपेटीतील आठ हजार रुपये असा सुमार ५० हजार रुपयांचे साहित्य लंपास केले. पहाटे सुशीला पोतदार ही देवीची पूजा करणारी महिला मंदिरात आली असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती मंदिराच्या विश्वस्तांना दिली. शिक्षण मंडळ सदस्य अमर जाधव यांनी गावभाग पोलिसात फिर्याद दिली आहे. घटनास्थळी ठसेतज्ज्ञ व श्वानपथकास पाचारण करण्यात आले होते.श्वानाने नदीवेस नाक्यापर्यंत माग काढला. गावभागचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांनी मंदिराला भेट दिली. काल श्रीपादनगर येथील जैन श्वेतांबर मनीधारी जिनचंद्रसूरी दादावडी ट्रस्टच्या मंदिराच्या कार्यालयात चोरटय़ांनी चोरी केली होती.