महापालिकेच्या कामासाठी आणलेल्या साहित्याची चोरी होत असल्याचा मुद्दा शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या एका बैठकीत पुढे आला. त्यावर चोरी करणाऱ्यांवर वचक बसावा यासाठी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी ठेकेदारांना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.    
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानअंतर्गत कोल्हापूर महापालिका हद्दीमधील विविध रस्त्यांची कामे महापालिकेमार्फत सुरू आहेत. या रस्त्यांच्या कामाच्या प्रगतीबाबत आयुक्त बिदरी यांनी शुक्रवारी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये आयुक्त बिदरी यांनी प्रत्येक रस्त्याच्या कामाचा आढावा घेतला व कामाची गती वाढवण्याबाबत सर्व संबंधितांना आदेश दिले. या बैठकीमध्ये ठेकेदारांनी रस्त्याच्या कामासाठी टाकलेल्या खडी, मुरूम, आरसीसी पाइप आदी साहित्याची चोरी होत असल्याबाबत आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर बिदरी यांनी संबंधित ठेकेदारांना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले. रस्त्याची कामे लवकर पूर्ण करण्याची सूचनाही त्यांनी केली.