आगामी २० वर्षांच्या काळात उज्ज्वल भारताच्या भवितव्यासाठी प्रचंड संधी आहेत. फक्त स्वयंशिस्त आणि तंत्रज्ञानाची सांगड घालण्याची गरज असल्याचे मत निर्लेपचे संचालक राम भोगले यांनी मांडले. तर, हाच धागा पकडत हिवरेबाजारचे माजी सरपंच आणि राज्य आदर्श गाव समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी विदेशी तंत्रज्ञानाला भारतीय आध्यात्माची जोड दिल्यास भारत महासत्ता होईल, असा आशावाद व्यक्त केला.
शहरातील दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित ‘रोटरी पर्वणी २०१४’ या संमेलनात ते बोलत होते. रोटरी इंटरनॅशनल प्रेसिडेंटचे प्रतिनिधी म्हणून श्रीलंकेचे गेहान सीरीबंदना यांनी प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून रोटरीने जग पोलिओमुक्त केल्याचा उल्लेख केला. या मोहिमेला अफगाण, पाकिस्तान यांसारख्या मुस्लिमबहुल देशात अधिक अडचणी आल्या. राम भोगले यांनी सुवर्ण संधी ही केवळ कल्पना असल्याचे सांगितले. संधी केवळ संधी असते. तिला आपण कसे हाताळतो यावर त्या संधीचे भवितव्य असते. क्रिकेटमध्ये प्रत्येक उसळणारा चेंडू हा षटकार मारण्यासाठी नसतो. आपल्या आयुष्यात आलेली संधी हाताळता यायला हवी. १९९१ मध्ये वैश्वीकरणाचे धोरण स्वीकारल्यानंतर जी संधी निर्माण झाली त्याही पेक्षा मोठी संधी येत्या २० वर्षांत आपल्यासमोर आहे. जैविक कचरा ही एक मोठी संधी असून वेस्टेज मटेरिअलचे आपण सेंद्रीय खतात रुपांतर करून अनेक उद्देश साध्य करू शकतो, असे त्यांनी सांगितले.
आदर्श गाव योजनेचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी योजना तयार होतात, राबविल्या जातात. परंतु ज्यांच्यासाठी योजना असतात ते कुठेच नसतात म्हणून योजना अयशस्वी होतात, असे मत मांडले. योजनेच्या यशासाठी गाव विकासात लोकसहभाग अपरिहार्य ठरतो. अन्यथा ‘गाव बकाल आणि शहर अस्वच्छ’ ही स्थिती बदलता येणार नाही. गाव केवळ साक्षर करून चालणार नाही. तर, संस्कारही करावे लागतील. लोकांना फुकट न देता त्यांचा सक्रीय सहभाग घ्या, तरच प्रगती शक्य आहे.  चंगळवाद थोपविला पाहिजे. त्यासाठी अध्यात्मातून संस्कार करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देताना रोटरी डिस्ट्रीक्ट ३०३० (इगतपुरी ते गोंदिया) ९० गावे दत्तक घेणार असल्याची घोषणा किशोर केडीया यांनी केली. धनराज वंजारी यांनी नव्या पिढीला दोष देण्याऐवजी ही पिढी कुटूंब आणि समाजात रुजवू पाहात असलेल्या नवीन जीवन मूल्यांकडे सकारात्मक नजरेने पाहण्याचे आवाहन केले.
यावेळी व्यासपीठावर प्रांतपाल दादा देशमुख, गेहान सीरबंदना, विश्वास सहस्त्रभोजने आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onनाशिकNashik
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Then india will be superpower
First published on: 23-12-2014 at 07:04 IST