गोदावरी कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडावे, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी जलसंपदामंत्री सुनिल तटकरे यांना पाठविलेल्या निवेदनात दिला आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शिर्डी विधानसभा मतदार संघातील मंत्र्यांनी समन्वय समितीची बैठक घेऊन शेतीसाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय यापूर्वीच घ्यावयास हवा होता. आजूबाजूच्या मतदारसंघात भंडारदरा धरणाचे शेतीसाठी एक आवर्तन यापूर्वी झाले असून, दुसरे आवर्तन सोडावे, अशी मागणी त्या कालव्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी करीत आहेत. परंतु गणेश परिसरातील शेतकऱ्यांसाठी अजून एकही आवर्तन सुटले नाही. पेरू बागा, ऊस, रब्बीची पिके तसेच जनावरांसाठी चारा या सर्व बाबींचे नुकसान होत आहे.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर गणेश परिसरातील जनतेने कमी मते दिल्याचा राग मनात धरुन त्यांनी या परिसरातील शेतकऱ्यांना व सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडले. त्यावेळी पाणी टंचाई संकट भेडसावत असताना स्वत: हात वर करून अधिकाऱ्यांवर निर्णय सोपविला. त्यावेळी शेतकऱ्यांना पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांचे कोटय़ावधीचे नुकसान झाले.