विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून थंडी जाणवायला लागल्याने विविध उबदार कपडय़ांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. शहरातील विविध भागात तिबेटीयन व्यावसायिकांनी थंडीपासून बचाव करणाऱ्या स्वेटर, मफलर, रजई, दुलई, कानटोपी, हातमोजे, कानपट्टी या व इतर काही उबदार कपडय़ांची दुकाने थाटली आहेत.
बैद्यनाथ चौकात आशीर्वाद चित्रपट गृहाजवळील मोकळ्या मैदानात तिबेटीयन रेफ्युजी स्वेटर्सतर्फे स्वेटरची दुकाने थाटण्यात आली असून सायंकाळच्यावेळी या ठिकाणी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. विशेषत ही दुकाने दिवाळीपूर्वी म्हणजे सप्टेंबर महिन्यात लावली जातात, पण यावर्षी तिबेटीयन रेफ्युजी संघटनेला महापालिकेकडून जागा मिळविण्यासाठी बराच उशीर लागला. कधी पटवर्धन मैदान तर कधी भगिनी मंडळाच्या परिसरात तिबेटीयन दुकाने लावण्यासाठी जागा दिली जात आहे. निश्चित अशी जागा मिळत नसल्यामुळे संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. नागपुरात उबदार कपडय़ाच्या विक्रीच्या निमित्ताने मोठय़ा प्रमाणात तिबेटीयन नागपूरसह विदर्भातील विविध भागात दुकाने थाटतात. यावर्षी तिबेटीयन व्यावसायिक मोठय़ा प्रमाणात नागपुरात आले आहेत. पूर्वी मिळेल त्या जागेवर, फुटपाथवर तिबेटीयन स्वेटरची दुकाने थाटत जात होती, मात्र गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी संघटना तयार केल्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या मध्यभागी जागा दिली जाते, असे तिबेटीयन संघाचे प्रमुख कर्म गॅलेक यांनी सांगितले. गेल्या चाळीस वर्षांपासून शहरात तिबेटीयन लोक व्यवसायासाठी स्थायिक झाले आहेत. काही लोक केवळ हिवाळ्यात येत असतात तर काही याच ठिकाणी स्थायिक झाले आहेत. साधारणत: जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात विदर्भात ते येत असतात आणि नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये काही तिबेटीयन गावाला परत जातात. गुजरात, राजस्थान, दिल्ली, हिमाचल प्रदेश व नेपाळमधील माल आणला जातो. दरवर्षी उबदार कपडय़ांना मोठय़ा प्रमाणात मागणी असल्यामुळे हिवाळ्याच्या दोन ते तीन महिन्यात तिबेटीयन विक्रेत्यांकडून दोन ते तीन कोटी रुपयांच्या कपडय़ांची विक्री होते. पुरुष, महिला, युवा आणि युवतीसाठी नवीन प्रकारचे उबदार कपडे बाजारात विक्रीसाठी आहेत. सध्या युवापिढीचा कल बघता ‘स्वेट शर्ट’ या जॅकेटला चांगली मागणी आहे. बाहेरून माल आणला जात असल्यामुळे जकात, जागेचे भाडे आणि इतर खर्च बघता दरवर्षी उबदार कपडय़ाच्या किमतीत वाढ होत आहे. विदर्भात नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात चांगली थंडी पडण्याची शक्यता असल्यामुळे गरम कपडय़ांची चांगली विक्री होईल, अशी आशा स्वेटर विक्रेत्यांना आहे. जॅकेट, लहान मुलांचे स्वेटर, कानटोपरे, हातमोजे, महिलांचे स्वटेर व शाल या कपडय़ांना चांगली मागणी आहे. काश्मिरी शाली व स्वटेरसुद्धा विक्रीला आहेत.
महिलांसाठी यावर्षी खास लेडीज कोटी नावाचे स्वेटर्स बाजारात आले आहे. त्यातही अनेक प्रकार आहेत. हाताने विणलेल्या स्वेटरला चांगली मागणी आहे. जॅकेट ४०० रुपयांपासून ५ हजार रुपयापर्यंत तर महिलांचे स्वेटर २०० पासून १२०० रुपयापर्यंत विक्रीला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Nov 2012 रोजी प्रकाशित
तिबेटी व्यावसायिकांनी नागपुरात थाटली उबदार कपडय़ांची दुकाने
विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून थंडी जाणवायला लागल्याने विविध उबदार कपडय़ांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. शहरातील विविध भागात तिबेटीयन व्यावसायिकांनी थंडीपासून बचाव करणाऱ्या स्वेटर, मफलर, रजई, दुलई, कानटोपी, हातमोजे, कानपट्टी या व इतर काही उबदार कपडय़ांची दुकाने थाटली आहेत.

First published on: 21-11-2012 at 02:02 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tibet shopkepers are noe baised in nagpur of winter cloths