महिला संरक्षणासाठी आतापर्यंत ४२ कायदे केले गेले, मात्र, त्यांचे पालन होत नाही. निरपराध मुलींना जन्म होण्याआधीच मारणे हे कसाबने केलेल्या क्रूर हल्ल्यापेक्षाही भयानक कृत्य असून तो एकप्रकारचा ‘वैद्यकीय दहशतवाद’ आहे, असे मत सामाजिक कार्यकर्त्यां अॅड. वर्षां देशपांडे यांनी भोसरीत व्यक्त केले.
आमदार विलास लांडे यांच्या पुढाकाराने आयोजित राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेत ‘स्त्री भ्रूण हत्या’ या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. पुरूषसत्ताक व्यवस्थेतून महिलांची सर्वच स्तरावर होणारी अवहेलना व मुस्कटदाबी त्यांनी अनेक उदाहरणे देत परखडपणे मांडली. राष्ट्रपती हा शब्द पुरूषी आहे. तेथे एखादी महिला बसेल, असे कधी पुरूषांना वाटलेच नव्हते. मात्र, एक कर्तृत्ववान मराठी महिला त्या पदावर बसली व तिने माहेरचे आडनावही लावले. सोनिया गांधी, सुषमा स्वराज, वृंदा करात, मीनाकुमारी, राबडीदेवी आदी महिलांनी प्रभावी राजकारण करून दाखवल्याचे दाखले त्यांनी दिले. हुंडा मागणाऱ्या मूर्खाशी मुलींनी लग्नच करू नये. लग्न म्हणजे मार्केट व नवरा मुलगा म्हणजे गिऱ्हाईक आहे, असे मुलींनी समजू नये. वंशाला दिवा पाहिजे म्हणून लग्न केली जातात. लग्न म्हणजे एकप्रकारचा बैलबाजार झाला असून हुंडय़ाच्या नावाखाली तेथे नवऱ्या मुलाची अक्षरश: बोली लागते, त्यातून आय.ए.एस. अधिकारीही सुटले नाहीत. त्यांचा भाव तर एक कोटीच्या घरात असतो व त्यांच्या सोयरिकीसाठी मंत्र्यांच्या रांगा लागलेल्या असतात. हे पदावर आल्यावर काय भ्रष्टाचार निर्मूलन करणार, असे सांगत तरूणांनी स्वत:चा लिलाव करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
मुली मारण्याचा धंदा मोठय़ा शहरांमध्येच फोफावला असून त्याचा धक्का इतरत्र बसतो. यातून जवळपास १५०० कोटींची उलाढाल होत असावी. मुलीच राहिल्या नाहीत तर काय परिस्थिती राहील. हजारोंच्या संख्येने शेतकरी आत्महत्या करतात, मात्र शिक्षक, ग्रामसेवक आत्महत्या करत असल्याचे ऐकिवात नाही. लग्नाची पोरगी घरात बसून असते. लग्नासाठी कर्ज काढले जाते. ते फेडता येत नाही. मग, त्यातून आत्महत्येचा मार्ग निवडला जातो, याचा विचार का होत नाही. रात्री बारा वाजता देखील महिला सुरक्षित आहेत, असे गृहमंत्री सांगतात.
मात्र, प्रत्यक्षात तशी वस्तुस्थिती नाही. दिल्लीतील बलात्कारित महिलेने त्या तरुणांना भाऊ म्हणून त्यांचे पाय धरायला हवे होते, असे सांगितले जाते. असे म्हणताना आपल्यालाच लाज वाटली पाहिजे, यासारखे अनेक मुद्दे देशपांडे यांनी उपस्थित केले.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2013 रोजी प्रकाशित
जन्म होण्यापूर्वीच मुलींना मारणे हा तर वैद्यकीय दहशतवाद – अॅड. वर्षां देशपांडे
महिला संरक्षणासाठी आतापर्यंत ४२ कायदे केले गेले, मात्र, त्यांचे पालन होत नाही. निरपराध मुलींना जन्म होण्याआधीच मारणे हे कसाबने केलेल्या क्रूर हल्ल्यापेक्षाही भयानक कृत्य असून तो एकप्रकारचा ‘वैद्यकीय दहशतवाद’ आहे, असे मत सामाजिक कार्यकर्त्यां अॅड. वर्षां देशपांडे यांनी भोसरीत व्यक्त केले.
First published on: 15-01-2013 at 02:33 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To kill the girls before to born this is medical terrorism ad varsha deshpande