महावितरणच्या वतीने ऑगस्ट २०१२ पासून केलेल्या वीज दरवाढीविरोधात महाराष्ट्र औद्योगिक समन्वय समितीच्या वतीने १३ डिसेंबर रोजी येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच १५ व १६ डिसेंबर रोजी सर्व लोकप्रतिनिधींना घेराव घालण्यात येणार आहे.
वीज दरवाढीस नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा) सह राज्यभरातील सर्व औद्योगिक संघटनांतर्फे सतत विरोध होत असून वीज दरवाढ रद्द करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. महाराष्ट्र औद्योगिक समन्वय समितीही पाठपुराव्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यभरात महाराष्ट्र औद्योगिक समन्वय समितीमार्फत १३ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते १ दरम्यान महावितरण कार्यालयासमोर घंटानाद, १५ व १६ डिसेंबर रोजी सर्व लोकप्रतिनिधींना घेराव आणि १८ डिसेंबर रोजी नागपूरला धरणे आंदोलन, असे आंदोलनाचे स्वरूप ठरविण्यात आले आहे. सर्व उद्योजक व निमा सभासदांनी या वीज दरवाढीच्या आंदोलनात मोठय़ा प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन निमातर्फे अध्यक्ष धनंजय बेळे, उपाध्यक्ष किशोर राठी, मनीष कोठारी, मानद सरचिटणीस मंगेश पाटणकर आदींनी केले आहे.