यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर राज्याला दूरदृष्टी असलेले राज्यकर्ते न मिळाल्यामुळे समाज दिशाहीन झाला. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले, असे प्रतिपादन प्राचार्य यशवंत पाटणे यांनी केले.
वाकुळणी येथील ग्रामविकास संस्था व ऊर्मी या संस्थेने आयोजित केलेल्या ‘एक संध्याकाळ कृष्णाकाठची’ कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
पाटणे म्हणाले, की यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या द्रष्टय़ा राजकारण्याने वंचितांना शिक्षण व सत्तेचा लाभ मिळावा, म्हणून सत्तेचे विकेंद्रीकरण केले. शिष्यवृत्ती लागू केली. मूळ कायदा लागू केला. स्वत:साठी व कुटुंबासाठी कुठलाही विचार न करता समाजहित समोर ठेवून केल्यामुळे सर्वच घटकांची उन्नती झाली. त्यांना लाभ मिळाला. आज मात्र अशा नेतृत्वाचा मोठा दुष्काळ झाल्यामुळे समाज दिशाहीन झाला आहे. जीवनात मूल्य सांभाळल्यामुळेच माणसे उंच होतात. यशवंतराव चव्हाण यांचे मूल्य, विचार आणि संस्कारातून राष्ट्रउभारणीची प्रेरणा तरुणांना मिळते.