– ‘आजचा दिवस माझा’चे प्रदर्शन दोन महिने पुढे
– कम्प्युटर ग्राफिक्स पसंत नसल्याने घेतला निर्णय
चंद्रकांत कुलकर्णी, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील तीन मोठी नावे निगडित असलेला ‘आजचा दिवस माझा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याची वेळ निर्मात्यावर आली आहे. २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार असलेला हा चित्रपट आता मार्च महिन्यात कधीतरी प्रदर्शित होणार असल्याची माहिती चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया यांनी ‘वृत्तांत’ला दिली. चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यामागे कोणत्याही हिंदी चित्रपटाचा हात नसून चित्रपटातील कम्प्युटर ग्राफिक्सने ही कमाल केली आहे.
तंत्रज्ञानाच्या मदतीने गोष्टी लवकरात लवकर झाल्या पाहिजेत, ही अपेक्षा असते. मात्र ‘आजचा दिवस माझा’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे जाण्यासाठी तंत्रज्ञान हेच मुख्य कारण ठरले आहे. चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित करण्याची सगळी तयारी आमच्याकडून झाली होती. मात्र चित्रपटात १५ ते १६ मिनिटांचा भाग कम्प्युटर ग्राफिक्सचा आहे. नीट पाहिले असता, सध्याचा हा भाग व्यवस्थित जमलेला नाही. त्यामुळे तो भाग पुन्हा बनवून घेतल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित करता येणार नाही, असे चित्रपट निर्माते व एव्हरेस्ट प्रोडक्शनचे प्रमुख संजय छाब्रिया यांनी सांगितले.
आम्ही ज्या कंपनीकडून ग्राफिक्स तयार करून घेतले होते, त्यांच्याकडे हे ग्राफिक्स परत पाठवण्यात आले आहेत. आता त्यावर पुन्हा काम करण्यात येईल, असे छाब्रिया यांनी सांगितले. हे ग्राफिक्स आल्यानंतर चित्रपट पुन्हा एकदा चित्रपट परिनिरीक्षण मंडळाला दाखवण्यात येईल. त्यानंतर मगच आम्ही तो प्रदर्शित करू शकू, असे त्यांनी स्पष्ट केले. आपण एवढय़ा मेहेनतीने एखादी चांगली गोष्ट बनवत असू, तर ती परिपूर्ण बनवण्याकडे आपला कल असायला हवा. त्याच परिपूर्णतेच्या हव्यासापोटी आम्ही प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे, असे ते म्हणाले.