खारघर येथील सायन-पनवेल मार्गावरील टोल नाक्याचा प्रश्न पनवेलमधील राजकीय घडामोडींना कलाटणी देणारा ठरला आहे. स्थानिकांना टोल न आकारण्याच्या प्रश्नावर आचारसंहिता लागण्यापूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निर्णय न घेतल्याने पनवेलचे कॉंग्रेस पक्षाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर तोफ डागली. आचारसंहितेचा मुहूर्त साधत ठाकूर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. सर्वपित्री अमावास्येचा मुहूर्त साधत माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. ठाकूर यांचे वारू रोखण्यासाठी इतर पक्षांनी व्यूहरचना तयार केली असून, यातच पनवेलमधील जाहीर सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील टोलचे जनक आपणच असल्याचे केलेले वक्तव्य कळीचा मुद्दा ठरणार असून, टोल प्रश्नावरून प्रचार तापणार असल्याची चिन्हे आहेत.   
 सायन-पनवेल महामार्गाच्या रुंदीकरणानंतर त्यावरील खर्च वसुलीसाठी खारघर येथे टोलनाका उभारण्यात आला. याचा सर्वाधिक  भरुदड स्थानिक नागरिकांना बसणार असल्याने त्यांच्यात रोष पसरला होता. टोलवरून आगामी निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाची कोंडी झाली असती, याचा फटका प्रशांत ठाकूर यांना बसणार हे रामशेठ ठाकूर यांनी जाणल्याने ठाकूर यांनी या टोलला विरोध करीत रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. तसेच या टोलमधून स्थानिकांना सूट मिळावी आणि आचार संहिता लागण्यापूर्वी त्यावर निर्णय होत, तसे आदेश पारित व्हावेत, असा आग्रह मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे प्रशांत ठाकूर यांनी धरला होता. वेळ पडली तर आमदारकीचा राजीनामा देऊ ही घोषणा करत ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकला होता. मात्र आचारसंहितेपूर्वी अनेक विषयांवर निर्णय घेण्याच्या घाईत टोल संदर्भातील निर्णय अखेर लटकला. याप्रकरणी निराशा पदरी पडलेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली.   
      लोकसभा निवडणुकीत मोदींची लाट आणि नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ आदी पाश्र्वभूमीवर भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला. भाजप प्रवेशादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘टोल खेळ मीच सुरू केला असून तो मीच संपवणार’, अशी सिंहगर्जना करीत ‘टोल बंद’च्या नावानेच मतांचा जोगवा मागण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र गडकरी यांच्या स्पष्टोक्तीमुळे पनवेलमधील प्रचार तापणार आहे. टोलवसुलीवरून  कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवर भाजपकडून सातत्याने टीका करण्यात येत होती. मात्र टोलचे निर्माते आपणच असल्याचे सांगत गडकरींनी विरोधकांना प्रचारात टीकेला आयता मुद्दा दिला आहे. मनसेने केसरी पाटील यांना पनवेलमधून उमेदवारी जाहीर केली आहे. यातच आघाडी आणि युतीचा झालेला काडीमोड, लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळी शेकापने शिवसेनेशी घेतलेली फारकत, यामुळे पनवेल विधानसभेच्या रिंगणात या सर्व पक्षांचे उमेदवार एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे राहणार असल्याने रणधुमाळी चांगलीच उडणार आहे. यातच सर्व पक्षांच्या अजेंडय़ावर पनवेलच्या विकासापेक्षा खारघर ‘टोल नाका हटाव’ हाच मुद्दा ठळकपणे असल्याने प्रचार तापणार आहे. टोल प्रश्नावरून होणाऱ्या कोंडी संदर्भात प्रशांत ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.
विरोधाची पाश्र्वभूमी
शेतकरी कामगार पक्षातून सलग दोन वेळा खासदार होण्याचा मान रामशेठ ठाकूर यांनी मिळवला. मात्र त्यांनी २००४ साली शेकापला रामराम करीत कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांचे पुत्र प्रशांत ठाकूर यांच्यासाठी लोकसभेसाठी राष्ट्रवादी पक्षाचा दावा असलेल्या मावळ मतदारसंघाची मागणी करू, असे आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनाची पूर्ती व्हावी यासाठी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांनी साधलेल्या मधुर संबंधांना भाव न मिळाल्याने हा मतदार संघ राष्ट्रवादीच्या परडय़ात पडला. राष्ट्रवादीकडून आजम पानसरे यांना उमेदवारी दिली. यानंतर उरण विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होत पनवेल आणि उरण या दोन मतदारसंघांची निर्मिती झाली. पनवेलमधून प्रशांत ठाकूर यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली व ते निवडून आले. राष्ट्रवादीला ठाकूर यांच्या राजकारणाची एक झलक आताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीतसुद्धा अनुभवायला मिळाली. राष्ट्रवादीला अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांच्या रूपाने पुन्हा पराभवाचे तोंड पाहावे लागले. या पराभवाला ठाकूर पिता-पुत्र कारणीभूत असल्याचे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे मत आजही ठाम असून, आघाडी तुटल्याने राष्ट्रवादीनेदेखील ठाकूर यांची कोंडी करण्याचा निणर्य घेतला असल्याचे कळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toll issue raise in assembly election in panel
First published on: 02-10-2014 at 01:54 IST