‘अजित बेकरी’च्या विक्रेत्याचे सुमारे एक लाख रुपये मोटारसायकलवर आलेल्या तीन लुटारूंनी लुटले. अजनी चौकातील कॉटन काँप्लेक्ससमोर गुरुवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली.
‘अजित बेकरी’चा बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत कारखाना असून रोज सकाळी तेथून विविध मालवाहू गाडय़ांमध्ये उत्पादित ब्रेड व इतर उत्पादने विक्रीस पाठवली जातात. ‘अजित बेकरी’चे एक रेस्टॉरंट व मुख्य विक्री केंद्र वर्धा मार्गावरील अजनी चौकात आहे. त्याच्या थोडे पुढे कॉटन काँप्लेक्सच्या वळणावर रोजच्या प्रमाणे आजही सकाळी एक मेटॅडोरमध्ये (एमएच/४०/वाय/३९९१) ब्रेड व इतर वस्तू आल्या. दुकानांमध्ये पोहोचवण्यासाठी लहान गाडय़ांमध्ये हा माल भरण्यात आला. रोजची विक्रीची रक्कम एका बॅगमध्ये गोळा करून ती मेटॅडोरमध्ये चालकाच्या आसनामागे ठेवण्यात आली होती. प्रकाश ढोके, अहमद शरीफ अब्दुल हमीद व संदीप महाजन हा ‘अजित बेकरी’चा लेखापाल हे लहान गाडय़ांजवळ उभ्या विक्रेत्यांशी बोलत होते.
तेवढय़ात दोघेजण त्यांच्याजवळ आले. मोटारसायकलचालक काही अंतरावर उभा होता. दोघेजण ढोके व अहमदजवळ आले.
‘मरे बहेनको क्यों छेडा’ असे म्हणत लुटारू वाद घालू लागले. त्यांनी झटापटही केली. यादरम्यान एका लुटारूने मेटॅडोरमध्ये चढून चालकाशेजारील बॅग काढली आणि तो मोटारसायकलजवळ
आला. त्याने इशारा करताच भांडणारे दोघे धावत मोटारसायकलजवळ गेले आणि त्यावर बसून पळून गेले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने यांच्यासह धंतोली व राजा पवार यांच्यासह हुडकेश्वर पोलीस तेथे आले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांनी याप्रकरणी अनोळखी लुटारूंविरुद्ध गुन्हा दाखल केला. लुटण्यात आलेली रक्कम नक्की किती होती हे स्पष्ट झाले नसले तरी ती सुमारे एक लाख रुपये असावे. पोलिसांनी फिर्यादींकडून घटनाक्रम जाणून घेतला. आरोपींची देहबोली पाहता ते सराईत लुटारू नसल्याचा, माहितगारानेच लुटीचा कट आखल्याचा पोलिसांचा संशय आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traders rs one lakh stolen
First published on: 10-04-2015 at 01:40 IST