वाहन चालविताना मोबाइलवर बोलणारे चालक वाहतूक पोलिसांच्या नजरेस पडत असल्याने त्यांच्यावर कारवाई करणे सोपे जात असले, तरी सिग्नलवर किंवा वाहन चालवत व्हॉट्स अ‍ॅपवर गप्पा मारणाऱ्या चालकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले असल्याने वाहूतक पोलीस अशा व्हॉट्स अ‍ॅपप्रेमी चालकांवर आता करडी नजर ठेवणार आहेत. त्यासाठी वाहन चालविताना मोबाइल फोन बंद करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. नवी मुंबईत गतवर्षी ३९६९ मोबाइलप्रेमींवर पोलिसांनी कारवाई केली असून, त्यांच्याकडून ४६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
मोबाइल फोन आता मानवी जीवनाचा अविभाज्य घटक झाला असल्याने, त्याला एक क्षणदेखील स्वत:पासून दूर ठेवण्याचा विचार केला जात नाही. त्यामुळे वाहन चालविताना मोबाइलचा वापर सर्रास केला जात असल्याने, मोबाइलवर बोलणाऱ्यांवर कारवाई केल्याच्या घटनांत वाढ झाली आहे. नवी मुंबई पोलिसांनी गतवर्षी अशा तीन हजार वाहनचालकांवर वाहन चालविताना मोबाइलचा वापर केल्याने कारवाई केली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या भीतीने निदान त्यांच्यासमोर तरी मोबाइलवर बोलण्याचे टाळले जात असल्याचे दिसून येते, पण व्हॉट्स अ‍ॅपने भल्याभल्यांना वेडे केले असल्याने व्हॉट्स अ‍ॅपवरील प्रेम गाडी चालवितानादेखील टाळता येण्यासारखे नाही, असे पोलिसांना दिसून आले आहे. त्यामुळेच सिग्नलवर गाडी उभी राहिल्यानंतर सर्वप्रथम व्हॉट्स अ‍ॅपचे स्टेटस् चेक केले जात असून, त्याला तात्काळ उत्तरे देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अलीकडे अनेकांकडे अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल फोन असल्याने एका क्षणात ही संदेशवारी पूर्ण केली जात आहे. त्यामुळे अनेक वाहनचालकांचे लक्ष या व्हॉट्स अ‍ॅपवर केंद्रित होत असल्याने मागील वाहनचालक हॉर्न वाजवून आपली नाराजी व्यक्त करीत असतात. काही वाहनचालकांना या हॉर्नच्या आवाजाचा पत्तादेखील किती तरी  वेळ लागत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता निर्माण होते. या व्हॉट्स अप प्रेमापोटी अलीकडे एखाद्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडीदेखील वाहनचालक एन्जॉय करीत असल्याचे दिसून येते. वाहन थांबल्यानंतर व्हॉट्स अ‍ॅप चेक करणे किंवा त्याला उत्तर देणे इतपत मर्यादित असलेले हे प्रेम अलीकडे काही अतिउत्साही वाहनचालक वाहन चालवीत या व्हॉट्स अ‍ॅपचा वापर करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे छोटय़ा-मोठय़ा अपघातांचे प्रमाण वाढले असल्याने, आता वाहन चालविताना मोबाइल फोन बंद ठेवण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. त्याचे जनजागृती फलक प्रत्येक सिग्नलवर लावण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाहन चालविताना मोबाइलचा वापर टाळावा यासाठी वाहतूक पोलिसांकडून नेहमीच जनजागृती आणि कारवाई केली जात आहे, पण वाहनचालक ही कारवाई फार गांर्भीयाने घेताना दिसत नाही. या वाहतूक नियमाच्या उल्लंघनात केवळ १०० रुपये दंड असल्याने तो सहज भरला जात असतो. सिगारेटच्या पाकिटावर सिगारेट ओढणे हानीकारक असल्याचे ठळक छापले जाते, तरी सिगारेट ओढणाऱ्यांचे प्रमाण कमी होत नाही, तसेच या नियमाकडे नेहमीच लक्ष वेधले जाते, पण तो पायदळी तुडवणाऱ्यांचे प्रमाणही कमी नाही.
बी. डी. गाढे,
पोलीस निरीक्षक, वाहतूक (रबाले)

मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic police watching whatsapp user while driving
First published on: 22-01-2015 at 12:42 IST