महिलांसाठीच्या विशेष बससेवेला प्रारंभ

शाळा व महाविद्यालय परिसरासह सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरांमुळे निर्माण होणाऱ्या भयग्रस्त वातावरणाच्या पाश्र्वभूमीवर, एस. टी. महामंडळाने किमान बस प्रवासात विद्यार्थिनींना सुरक्षितता प्रदान करण्याच्या उद्देशाने सोमवारपासून शहरातील दहा मार्गावर खास महिलांसाठी स्वतंत्रपणे बससेवा सुरू केली आहे. या बससेवेस मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन पुढील तीन महिन्यांत मार्गाच्या संख्येत लक्षणीय वाढ करण्याची तयारीही महामंडळाने दर्शविली आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेसने ही विशेष बससेवा सुरू करण्यासाठी आंदोलन केले होते. ही मागणी पूर्णत्वास गेल्यामुळे राष्ट्रवादीने औपचारिक स्वरूपात उद्घाटन करत महिलांसाठीच्या या विशेष बससेवेचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
शाळा व महाविद्यालय भरण्याच्या व सुटण्याच्या कालावधीत बसला लटकून जाणारे विद्यार्थी हे नेहमीचे चित्र. परंतु या बसमध्ये प्रवेश मिळविता मिळविता विद्यार्थिनी व महिलांची दमछाक होते. त्यात गर्दीचा फायदा घेत विद्यार्थिनींची छेडछाड काढण्याचे प्रकार घडत असतात. शाळा व महाविद्यालयात दररोज असे दिव्य करून जावे लागत असल्यामुळे उपरोक्त घटनांविषयी तक्रारी करण्याचेही टाळले जाते. शालेय विद्यार्थिनींची अवस्था तर त्याहून बिकट. रविवार कारंजा परिसरात सायंकाळी फेरफटका मारल्यावर बसमध्ये केवळ प्रवेश मिळविताना त्यांना कशी धडपड करावी लागते ते लक्षात येते. या परिसरात विद्यार्थ्यांची इतकी गर्दी असते की, बस आली रे आली की एकच गोंधळ उडतो. विद्यार्थी व वयाने मोठे असणारे प्रवासी बसमध्ये प्रवेश मिळवितात. त्या वेळी शालेय विद्यार्थिनींना बसमध्ये शिरणेही दुरापास्त होते. या एकूणच स्थितीवर महिलांसाठी व प्रामुख्याने विद्यार्थिनींना डोळ्यासमोर ठेवून कार्यान्वित केलेल्या विशेष बससेवेने काही अंशी का होईना तोडगा निघणार आहे.
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी विशेष बससेवा सुरू करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने वास्तुविशारद अमृता पवार यांच्या नेतृत्वाखाली एसटीच्या विभागीय कार्यालयावर दोन महिन्यांपूर्वी मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर महामंडळाचे अध्यक्षांकडे पाठपुरावा करून ही मागणी मान्य करवून घेण्यात आल्याचे पवार यांनी म्हटले आहे. केवळ महिलांसाठी चालविल्या जाणाऱ्या या बसेसचे मार्ग व त्यासाठीच्या काही वेळा निश्चित आहेत. इतर कालावधीत त्या सर्वसाधारण बसप्रमाणे धावतील. विशेष बसच्या वेळांचे नियोजन करताना शाळा व महाविद्यालय सुटण्याच्या वेळा, विद्यार्थिनींची होणारी गर्दी हे घटक प्रामुख्याने विचारात घेण्यात आले आहेत. संबंधित बसेसच्या उर्वरित फे ऱ्या सर्वसाधारण बसप्रमाणे राहणार असल्याचे महामंडळाचे विभागीय नियंत्रक एस. बी. देशमुख यांनी सांगितले. या फेऱ्यांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन महामंडळाने उपरोक्त मार्गावर त्या बसची कायमस्वरूपी केवळ महिलांसाठी व्यवस्था करावी, तसेच शहरातील इतर मार्गावरही त्याच पद्धतीने बसेसचे नियोजन करावे, अशी मागणी पवार यांनी केली आहे.
सोमवारी मेळा बस स्थानकावर या विशेष बससेवेचे शेफाली भुजबळ, अमृता पवार, शहराध्यक्ष शरद कोशिरे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. नाशिकहून ओझरला जाणारी ही बस त्यासाठी खास पद्धतीने सजविण्यात आली होती. या बससेवेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन पुढील तीन महिन्यांत त्यांची संख्या वाढविण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले. फेब्रुवारीपर्यंत शहर बस वाहतुकीसाठी नव्याने २०० वाहक व २०० चालक उपलब्ध होणार आहेत. सध्या महामंडळाकडे ५० बसेस उपलब्ध झाल्या असून नव्याने ५० बसेसची मागणी करण्यात आली आहे. ही पूर्तता झाल्यानंतर महिलांसाठी बसेसची संख्या वाढविली जाणार असल्याचे देशमुख यांनी नमूद केले.     
विशेष महिला बससेवेचे मार्ग व वेळा
* मॉडेल कॉलनी-पंचवटी डेपो (११.०५)
* निमाणी शालिमारमार्गे नाशिकरोड  (०९.३०-१०.०५)
* ध्रुवनगर- श्रमिकनगरमार्गे बोरगड  (०५.४५- ०६.४५)
* बिटको महाविद्यालय व भाटिया कॉलेज- देवळाली कॅम्प डेपो (१२.२५-१३.३०)
* निमाणी-रविवार कारंजा व सातपूरमार्गे श्रमिकनगर (१७.२०-१७.५५)
* नाशिकरोड-पेठरोड (१८०५-१९.००)
* खुटवडनगर-सीबीएस (१७.५५-१८.१५)
* सीबीएस-म्हसरूळ (१८.२०-१८३५)
* केटीएचएम महाविद्यालय -पांडवलेणे (१७.४०-१८१०)
* महात्मानगर-ओझर मिग (१२.०५.१३.१५)
* सीबीएस-पाथर्डी फाटा (०६.३०-०६.५०)
* पाथर्डी फाटा- संदीप फाऊंडेशन (०६.५५-०७.५५, ०९.०५-१०.०५)
* संदीप फाऊंडेशन-पाथर्डी फाटा (०८.००-०९.००, १०.१०-११.००)
* निमाणी-केटीएचएम (११.०५-११.१५)