कोणाला सलाईन लावण्याची लगबग तर कोणाचा ‘एक्स-रे’ काढण्याची तयारी, कोणाला वेदनाशामक इंजेक्शनचा डोस तर कोणाच्या दुखापतीची चाचपणी.. घोटी येथील रेल्वे अपघातातील गंभीर जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात आणल्यानंतर आरोग्य विभागाची यंत्रणा कार्यप्रवण झाली. जिल्हा शल्य चिकित्सकांसह सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर उपचारासाठी प्रयत्न केले.
जिल्हा शासकीय रुग्णालयाचा कारभार नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडतो. परंतु, अकस्मात कोसळणाऱ्या संकटावेळी रुग्णालयाची यंत्रणा कार्यतत्पर राहते याचे चित्र पहावयास मिळाले. मंगला एक्स्प्रेसच्या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना घोटी, नाशिक व शहरातील काही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील आठ रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल झाले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालयाची संपूर्ण यंत्रणा त्वरित कार्यरत झाली. जखमी प्रवाशांमध्ये उत्तम खंडेलवाल (५०), मुरलीधरन् (५५), पुरूषोत्तम बैरागी (४२), माधुरी बैरागी (२२), कुमान बनवाणी (४५), राजेशकुमार (३२), सुनीता राठोड (२९) यांचा समावेश आहे. राजू कुशवाह या प्रवाशाचे उपचारापूर्वीच निधन झाले. जखमी झालेले बहुतेक प्रवासी बेशुद्धावस्थेत होते. जे शुध्दीत होते, त्यांना बोलताना येत नव्हते. काही रुग्णांच्या हातापायाला मार लागला होता. कोणाच्या डोक्याला इजा झाली होती. या स्थितीत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी व उपचाराचे काम आरंभिले. जिल्हा शल्य चिकित्सक रवींद्र शिंगे यांच्या नेतृत्वाखाली निवासी वैद्यकीय अधिकारी गजानन होले, अस्थिरोगतज्ज्ञ सुनील शहा यांच्या पथकाला काही खासगी व शिकाऊ डॉक्टरांनीही मदत केली. त्यात इतर विभागातील परिचारिका व कर्मचाऱ्यांनाही सक्रिय योगदान दिले.
ज्या रुग्णांना गंभीर दुखापत झाली, त्यांना लगेच ‘एक्स रे’ काढण्यासाठी रवाना केले गेले. गंभीर जखमींना वेदनाशामक इंजेक्शन व सलाईन देण्यात आले. दरम्यानच्या काळात रुग्णालयात गर्दी होऊ नये म्हणून कर्मचारी संघटनेने मृत व जखमी प्रवाशांची नावे प्रवेशद्वारावरील फलकावर प्रसिध्द केली. अपघाताची माहिती समजल्यानंतर मूळचे केरळमधील परंतु सध्या नाशकात वास्तव्यास असलेल्या नागरिकांसह राजकीय पक्षांचे पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून माहिती देण्याचे काम काही जणांनी केले.