भरधाव मालमोटारीने मोटारसायकलला पाठीमागून धडक दिल्याने मोटारसायकलवरील एका पोलिसाचा मृत्यू झाला, तर दुसरा पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला. मंगळवारी सकाळी सव्वानऊच्या दरम्यान नगर रस्त्यावर वाळूजजवळ हा अपघात घडला. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंदवून मालमोटार चालकाला ताब्यात घेतले. अपघातात सापडलेले दोन्ही पोलीस कर्मचारी वाळूज पोलीस ठाण्यातील असून, डय़ुटी करून शहरातील आपल्या घराकडे निघाले होते. मात्र वाटेतच हा अपघात झाला.
अरुण निवृत्ती उघडे (वय ४६) असे मृताचे नाव असून, पोलीस नाईक प्रमोद राजाराम पवार (बक्कल नं. २१०८, वाळूज पोलीस ठाणे) जखमी झाले. त्यांच्यावर सिग्मा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे दोघेही आपली डय़ुटी संपवून मोटारसायकलवरून (एमएच २० सीई ११५९) औरंगाबाद शहराकडे निघाले होते. नगर रस्त्याने ए. एस. क्लबजवळून शहराकडे येत असताना पाठीमागून भरधाव आलेल्या मालमोटारीने (एचआर ५५ बी ९३३३) क्लीनरच्या बाजूने मोटारसायकलला जोराची धडक दिली. धडक बसताच दोघेही खाली पडले व गंभीर जखमी झाले. अपघात झाल्याचे पाहून या रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांनी थांबून दोघांनाही मिळेल त्या वाहनाने तातडीने घाटी रुग्णालयात पाठविले. तेथे उपचार घेताना उघडे यांचा मृत्यू झाला, तर पवार यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्यावर सिग्मा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील मालमोटार परप्रांतातील असून अपघातानंतर लोकांनी चालकाला पकडून ठेवले व नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याचे नाव कळू शकले नाही. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी याबाबत गुन्हय़ाची नोंद केली.
सुरक्षितता वाऱ्यावर!
टोलनाक्यापासून वाळूज, पंढरपूरकडे येताना वाहनांची मोठी वर्दळ वाढते. वाळूज, पंढरपूर भागात छोटय़ा वाहनांना मार्ग काढताना कसरत करावी लागते. पादचाऱ्यांचीही जीव मुठीत घेऊन ये-जा सुरू असते. रस्ता ओलांडणे आणि वळणावरील ठिकाणी सुरक्षित बाहेर पडणे हेही मोठे कष्टप्रद होऊन बसते. याबरोबरच प्रचंड रहदारीचा असूनही रस्त्याची लहानमोठय़ा खड्डय़ांनी अक्षरश: चाळणी झाली आहे. रस्त्याने जाताना खड्डे चुकवत पुढे जाणे हेही मोठे दिव्यच ठरले आहे. त्यामुळे या टप्प्यात नेहमीच लहानमोठे अपघात घडत असतात. अपघातात काही जीवितहानी झाल्यास तेवढय़ापुरती चर्चा होते. नंतर या प्रश्नाकडे दुर्लक्षच होते. मंगळवारी सकाळी पोलीस कर्मचाऱ्यांनाच भीषण अपघातास सामोरे जावे लागले. आता तरी वेळीच यावर काही मार्ग शोधून नागरिक, तसेच छोटय़ा वाहनधारकांच्या सुरक्षिततेचे उपाय योजले जावेत, या मागणीने पुन्हा उचल खाल्ली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Truck police two wheeler accident one kill aurangabad
First published on: 26-02-2014 at 01:50 IST