पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या मुलाकडे नऊ हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना खंडणी विरोधी पथकाने शुक्रवारी अटक केली आहे. महादेव एकनाथ शिंदे (वय २८, रा. वडगाव शेरी) आणि मनोज इंद्रव्रत जेदिया (रा. सुभाषनगर, येरवडा) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी जगतसिंह मोहनसिंग राजपाल (वय ३५, रा. रास्ता पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्यानीनगर येथील रस्त्यावर राजपाल यांचा खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे. २० जानेवारी रोजी रात्री पावणेआठ वाजता आरोपींनी राजपाल यांना ‘येथील प्रत्येक पथारीवाले मला दरमहा नऊ हजार हप्ता देतात. तूपण हप्ता दे नाहीतर तुझी व्हॅन फोडून टाकील’ अशी धमकी दिली. त्यामुळे राजपाल यांनी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत याच्याकडे येऊन तक्रार दिली. त्यांनी या परिसरात या दोघांचा शोध घेऊन अटक केली. अशा प्रकारची गुंडगिरी अथवा खंडणी मागणारे असतील तर त्यांची तक्रार खंडणी विरोधी पथकाकडे करावी, असे आवाहन सावंत यांनी केले आहे.