शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाकरिता पाहुणे म्हणून आलेले सरुबाई बाबूराव उंडे (वय ५८, रा. बागडी, ता. आंबेगाव) व मारुती बजाभाऊ वाळुंज (वय ६५, रा. लोणी, ता. आंबेगाव) हे मृतावस्थेत आढळून आले, तर अरुण संतोष बराटे (वय ११, रा. बागडी, ता. आंबेगाव) हा मुलगा बेशुद्ध अवस्थेत आढळून
आल्याने या परिसरात खळबळ उडाली.
उंडे व वाळुंज यांच्या मृत्यूप्रकरणी गुढ वाढले असून त्यांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला याची चर्चा या परिसरात असून मृतदेहाचे शवविच्छेदन करून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रामदास किसन पोरहरकर यांच्या घरी सत्यनारायण महापूजा, जागरण गोंधळाचा व जेवणाचा कार्यक्रम होता. त्यासाठी पोरहरकर यांचे नातेवाईक सरुबाई उंडे, मारुती वाळुंज, अरुण बराटे हेही आले होते. रात्री ९ च्या सुमारास जेवण करून हे सर्वजण झोपले. पहाटे पाचच्या सुमारास या पाहुण्यांना आरतीसाठी उठविण्याकरिता गेल्यावर हा प्रकार लक्षात आला. त्यावेळी स्थानिक डॉक्टरांना बोलविण्यात आले. उंडे व वाळुंज हे मृतावस्थेत तर अरुण बराटे हा बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला उपचाराकरिता नारायणगाव येथील खासगी दवाखान्यात हलविण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास शिरूर पोलीस ठाण्याचे
सहायक निरीक्षक महेश स्वामी
करत आहेत.