ग्रामीण भागातील जनतेचा एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत सहभाग वाढविण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम जनजागृती अभियान यशस्वीपणे राबवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी ओमप्रकाश बकोरिया यांनी केले आहे.
अभियानानिमित्त जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बकोरिया बोलत होते. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. आर. नायक, पंचायत समिती सभापती गीताताई भिल, उपजिल्हाधिकारी कुंदनकुमार सोनवणे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक माधव जगताप उपस्थित होते. भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता लोक सहभागातून वनराई बंधारे, सिमेंट बंधाऱ्यांची कामे रोजगार हमी योजनेतून करावीत आणि गावातील पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे निर्देशही बकोरिया यांनी दिले.
या वेळी रुरल फाऊंडेशनचे प्रकाश पाटील, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी कुंदनकुमार सोनवणे, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक सु. दे. वाढई, प्रकल्प संचालक माधव जगताप यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन जी. पी. गिरासे यांनी केले. आभार तालुका कृषी अधिकारी सी. के. ठाकरे यांनी केले.