भारतातील सर्वच विद्यापीठांमध्ये उपजीविकेसाठी कौशल्य शिकवले जातात. मात्र, जीवन कौशल्य कोणत्याही विद्यापीठात शिकवले जात नसून त्याची सर्वानाच गरज आहे. त्यासंबंधीचे अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरू करावेत, यासाठी कुलगुरूंकडे प्रस्ताव देणार असल्याचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ. केशव भांडारकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
डॉ. भांडारकर म्हणाले, तार्किक विचार करणे, समस्यांचे समाधान करणे, संघर्ष व्यवस्थापन, ताणतणाव व्यवस्थापन इत्यादींसारखे अभ्यासक्रम प्रत्येक माणसाच्या जीवनाशी संबंधित आहेत. ज्या ठिकाणी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली त्या चेन्नईतील श्रीपेरंगगुदूर येथे राजीव गांधी जीवन कौशल्य शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली.
सर्जनशीलता, मौलिकतेसंबंधीचे शिक्षण कोणत्याच विद्यापीठात दिले जात नाही. तार्किक विचार करणे किंवा विचार क्षमता विकसित करण्यासारखे विषयही अभ्यासक्रमात असत नाहीत. याची आपल्याला गरज असल्याचे भांडारकर म्हणाले.
राज्यात ४ हजार ३७२ मुक्त विद्यापीठाची केंद्रे आहेत. नागपूर जिल्ह्य़ात २४० केंद्र आहेत. एकूण ६ लाख २५ हजार विद्यार्थी या शैक्षणिक सत्रात असून नागपूर जिल्ह्य़ात ६५ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. पदविका अभ्यासक्रम ५०, पदवी अभ्यासक्रम ४०, पदव्युत्तर अभ्यासक्रम २५ आणि पाच पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम विद्यापीठात आहेत. पूर्वतयारी परीक्षा येत्या १५ फेब्रुवारीला होणार आहे. तसेच एम.ए., एम.कॉम. आणि एम.एस्सी. (संप्रेषण आणि दुरस्त अभ्यासक्रम) यासाठी १० फेब्रुवारीपासून प्रवेश दिले जाणार आहेत. प्रवेश घेण्याची अंतिम मुदत २० मार्च आहे.
मध्यंतरी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने परिपत्रकाद्वारे एम.फील आणि पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी पारंपरिक विद्यापीठ असताना मुक्त विद्यापीठांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमांचेच शिक्षण देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मुक्त विद्यापीठांमध्ये केवळ कृषी अभ्यासक्रमातच पीएच.डी. करणे शक्य असल्याचे डॉ. भांडारकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: University need to teach life skills
First published on: 31-01-2015 at 01:02 IST