जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीची कोणतीही परवानगी न घेता संगमनेर पंचायत समितीच्या जुन्या सभागृहाचा ताबा घेऊन तेथे सेतू कार्यालय सुरु करण्यात आले. यासंदर्भात पंचायत समिती सदस्य सरुनाथ उंबरकर यांनी आवाज उठवल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने याबाबत दखल घेऊन कार्यकारी अभियंता दिलीप पालवे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.
शनिवारी तहसीलदार डॉ. संदीप आहेर यांनी पंचायत समितीच्या जुन्या सभागृहात सेतू कार्यालय सुरु करण्यासाठी सेतू चालकांना परवानगी देत त्या सभागृहाचा ताबा त्यांच्याकडे दिला. जिल्हा परिषदेच्या मालकीची ही इमारत पंचायत समितीच्या ताब्यात आहे. इमारत ताब्यात देताना गटविकास अधिकारी भुपेंद्र बेडसे यांनीदेखील कोणतीही परवानगी घेतली नाही अथवा कोणी हरकतही घेतली नाही. त्यामुळे अनधिकृतरित्या इमारतीचा ताबा घेऊन तेथे सेतू सुरु करणाऱ्या चालक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी उंबरकर यांनी गटविकास अधिकारी बेडसे यांच्याकडे केली होती. बेडसे यांनी त्यांच्या मागणीची दखल न घेतल्याने अखेरीस आज उंबरकर यांनी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रिवद्र पाटील यांच्या कानावर हा प्रकार घातला. त्यांनी अशा जिल्हा परिषदेची इमारत कोणालाही कोणत्याच कामासाठी परस्पर देण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे तेथे झालेली कृती चुकीचे असल्याचे सांगत या प्रकाराची चौकशी करण्यासाठी कार्यकारी अभियंता दिलीप पालवे यांची नेमणूक केली आहे. पालवे यांनी चौकशी करुन पाच दिवसांत अहवाल सादर करावयाचा आहे.     
शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी
तहसीलदार संदीप आहेर आणि गटविकास अधिकारी भुपेंद्र बेडसे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जावी. पाच दिवसांत त्यांच्यावर कारवाई आणि सेतू चालकावर गुन्हा दाखल न झाल्यास उपोषणाचा इशारा उंबरकर यांनी दिला आहे.